मंत्री पद व सभापती पद देवून सुद्धा वनवास कसा ? : सुभाष शिंदे; श्रीमंत रामराजेंचे नाव न घेता सडकून टीका

फलटण तालुक्याच्या विकासामध्ये शरद पवार साहेबांचा मोठा हात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 07 फेब्रुवारी 2024 | फलटण | माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी फलटण तालुक्यातील काही नेत्यांना भरभरून दिलेले आहे. त्यामध्ये सुरुवातीला मंत्रीपद नंतर सत्ता नसताना सुद्धा विधान परिषदेचे सभापतीपद पवार साहेबांनी मिळवून दिले आहे. फलटण तालुक्याच्या विकासामध्ये शरद पवार साहेबांचा मोठा हात नेहमीच राहिलेला आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा काही नेते ‘रामाला सुद्धा वनवास भोगावा लागला होता’ असे जर जाहीर कार्यक्रमात बोलत असले तर आगामी काळामध्ये जनता त्यांना त्यांची किंमत दाखवून देईल; अशी सडकून टीका शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष शिंदे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केली.

फलटण येथील सुभाष शिंदे यांच्या “जिद्द” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुभाष शिंदे बोलत होते. यावेळी शरद पवार गटासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत दिलेला आहे. तो अतिशय निंदनीय असून ज्याने पक्ष सुरू केला त्याच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. येणाऱ्या काळात निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात आमचा पक्ष दाद मागेल व त्याला सर्वोच्च न्यायालय नक्कीच न्याय देईल; असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की; आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो कोणी उमेदवार निवडणूक लढवेल त्याला विजयी करण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता सर्व ताकतीने काम करणार आहे.

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी शरद पवार साहेबांच्या माध्यमातून निरा – देवधर, धोम – बलकवडी, फलटण रेल्वे असे मोठे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. कोणीही कितीही स्वतःचे कौतुक केले तरी हे सर्व प्रकल्प पूर्णत्वास जाण्यामध्ये शरद पवार साहेबांचा आशीर्वादच नेहमी राहिलेला आहे. फलटण तालुक्यामधील विकास कामे करण्यासाठी शरद पवार साहेब नेहमीच आग्रही होते व आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा फलटण तालुक्यात विकासात्मक कामे करण्यासाठी पवार साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण कार्यरत राहू; असे मत यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!