फलटण शहरात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करा; मनसेची मागणी

मनसे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; मातांच्या गैरसोयीकडे वेधले लक्ष


स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : फलटण नगरपरिषद मुख्यालय आणि शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांसाठी तातडीने ‘हिरकणी कक्ष’ (बाळांना स्तनपान करण्यासाठी विशेष खोली) स्थापन करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना दिले आहे.

शासकीय कामानिमित्त नगरपरिषदेत किंवा इतर ठिकाणी येणाऱ्या लहान बाळांच्या मातांना स्तनपानासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित जागा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना उघड्यावर किंवा गैरसोयीच्या ठिकाणी बसावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि गोपनीयतेचा भंग होतो, असे शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.

‘हिरकणी कक्ष’ ही केवळ सोय नसून महिलांची मूलभूत गरज आहे. शासकीय धोरणांमध्ये याची तरतूद असूनही शहरात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने शहरातील विविध ठिकाणी हे कक्ष स्थापन करून मातांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!