गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी नोंदणीकृत संस्थेची उभारणी करा : आयकर सह आयुक्त तुषार मोहिते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । फलटण । गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाताना आवश्यक आर्थिक मदत करण्यासाठी सामाजिक संस्था स्थापन करुन त्यामाध्यमातून निधी उभारण्याची आणि तो गरजुंपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना उपस्थितांसमोर ठेवून फलटण पासून या योजनेची सुरुवात करण्याचे आवाहन आयकर सह आयुक्त तुषार मोहिते यांनी केले आहे.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करणाऱ्या गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार म. फुले नगर (नगर परिषद कामगार वसाहत) येथे भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती आणि साहस क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त सहभागाने करण्यात आला. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना आयकर सह आयुक्त तुषार मोहिते बोलत होते, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते. निवृत्त जिल्हा न्यायाधीश विठ्ठलराव काकडे, अंध, अपंग, मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, भगवान गौतम बुध्द जयंती महोत्सव समिती आणि साहस क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सभासद, कॉलनीतील सर्व कुटुंबीय आणि शहरवासीय उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेले नायब तहसीलदार प्रतिक आढाव, सहाय्यक अभियंता जलसंधारण नेहा मोहिते, पोलीस उप निरीक्षक विशाल घोरपडे, सहाय्यक व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक संदीप मोरे, राज्यस्तरीय सेट परीक्षा उत्तीर्ण प्रा. स्वरुप अहिवळे आणि प्रा. अक्षय अहिवळे या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा दिलेला संदेश स्वीकारुन या समाजातील तरुण अक्षरशः बेभान होऊन शिकले, उच्च गुणवत्ता प्राप्त केली आता संघटित होण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आवाहनाप्रमाणे या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित होऊन संस्थेच्या माध्यमांतून मदत करण्याची आवश्यकता असल्याचे आयकर सह आयुक्त तुषार मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेला अर्थसहाय्य करण्याचे आवाहन आपल्या समाजातील शेकडो आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांना करण्याबाबत सुचवितानाच ते या कामी निश्चित मदत करतील याची ग्वाही आयकर सह आयुक्त तुषार मोहिते यांनी यावेळी दिली. इतर कोणाकडे मदतीसाठी याचना करण्यापेक्षा आपली यंत्रणा निर्माण करण्यात आपला व या गुणवंतांचा स्वाभिमान जपला जाण्याचे सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघर्षातून पुढे आलेल्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून त्याच पद्धतीने किंबहुना अधिक संघर्षातून स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या तरुणांना योग्य ती मदत, पुरेसे अर्थ सहाय्य करुन त्यांची चिंता दूर करण्याचे आवाहन समाजातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना करताना ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे आयकर सह आयुक्त तुषार मोहिते यांनी स्पष्ट केले.

समाजातील वाढती शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासनात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या पाहता आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्न पूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे नमूद करीत आगामी काळात आपण व समाज निश्चित स्वयंपूर्ण होऊ असा आशावाद निवृत्त जिल्हा न्यायाधीश विठ्ठलराव काकडे यांनी व्यक्त केला. कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी अथक कष्ट करावे लागतात असे सांगून यशस्वी होण्यासाठी पैशाची अडचण नसते तर योग्य ध्येयाने, चिकाटीने काम करणे महत्वाचे असते. योग्य ध्येयासाठी प्रयत्नशील असताना पाठीशी शाब्बासकीची थाप अन खंबीर साथ असल्यास यश लवकर मिळते. प्रत्येकानेच अथक संघर्ष करुन यश संपादन केले असले तरी येणाऱ्या पिढीसाठी प्रत्येकाने योगदान देण्यासाठी तत्पर असले पाहिजे अशी अपेक्षा निवृत्त जिल्हा न्यायाधीश विठ्ठलराव काकडे यांनी व्यक्त केली.

तुमची प्रगती तुम्हीच करु शकता, तेवढी जिद्द, चिकाटी ठेवा. हाताच्या रेषावरुन आपले भविष्य घडवू नका तर आपल्या हाताच्या कष्टाने आणि बुद्धीने आपले उज्वल भविष्य निर्माण करा असे आवाहन करताना डाॅ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या व समाजाच्या विकास व प्रगतीसाठी समान संधी, काही राखीव जागा तसेच प्राथमिक पासून ते परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध करुन ठेवल्या असल्याचे विठ्ठलराव काकडे यांनी स्पष्ट केले.

सत्कारमूर्ती सर्वश्री प्रतिक आढाव, विशाल श्रीमंतराव घोरपडे, संदीप मोरे, स्वरुप अहिवळे, अक्षय अहिवळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या सत्कारातून लाभलेले बळ प्रशासकीय कामात प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात अरविंद मेहता यांनी गुणवंत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्वच अधिकाऱ्यांनी मोठ्या संघर्षातून अपार मेहनत व प्रयत्नातून समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याची भावना व्यक्त करताना कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात, जे या सर्वच अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. त्यासाठी हे अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करताना त्यांच्या मदती शिवाय हे यश मिळू शकत नाही. समाजातून असे अनेक अधिकारी निर्माण व्हावेत त्यांनी इतरांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.

प्रारंभी विकास काकडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा सत्कार केल्यानंतर साहस क्रीडा मंडळ व भगवान गौतम बुध्द जयंती महोत्सव समितीच्या कामकाजाचा आढावा घेत साहस क्रीडा मंडळाने समाज घडविण्यासाठी गेल्या २५ वर्षात दिलेले योगदान उपस्थितांसमोर ठेवले. सौ. कांबळे यांनी सूत्र संचालन आणि समारोप व आभार प्रा.अजय अहिवळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!