
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून, हरकती नोंदवण्यासाठी दिलेली १३ ऑक्टोबरची मुदत अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही मुदत ३ ते ४ दिवसांनी वाढवण्यात यावी, अशी मागणी राजे गटाचे समर्थक प्रीतसिंह खानविलकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे खानविलकर यांनी म्हटले आहे की, अनेक प्रभागांमध्ये मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाली आहेत. यामुळे नागरिकांना आपले नाव शोधताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, नवीन मतदारांनाही नाव नोंदणीत अडचणी येत आहेत.
नगरपालिका कर्मचाऱ्यांना नवीन प्रभाग रचनेनुसार काम करण्यासाठी पुरेशी मदत उपलब्ध करून दिल्यास मतदार यादी दुरुस्तीचे काम अधिक जलद गतीने होऊ शकते. कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी हरकतींची मुदत वाढवणे आवश्यक आहे, असेही खानविलकर यांनी म्हटले आहे.