‘बारामती’ म्हणजे आपसूकच तोंडात नाव येतं ‘पवार’, ‘बारामती’ म्हणजे ‘पवार’ आणि ‘पवार’ म्हणजे ‘बारामती’ हे समीकरण गेली ५० दशके संपूर्ण देश अनुभवत आहे.
बारामती म्हटलं की, इथला विकास डोळ्यांसमोर येतो, इथले राजकारणातले पवार घराणे डोळ्यांसमोर येते. सामजिक, कृषी, विज्ञान, कला, व्यवसाय, शिक्षण, राजकारण इ. क्षेत्रात सक्रिय असणारं हे मोठं पवार घराणं. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत समाजात सक्रिय असलेलं हे कुटुंब.
‘पवार’ म्हणजे पहिल्या फळीत प्रामुख्यानं येतं राजकारण. याला कारण ही तसंच आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण हादरवण्याची क्षमता किंबहुना तो अनुभव पाठीशी असणारे व आपल्या आईचा राजकीय वारसा पुढे चालवणारे शरद पवार साहेब. शरद पवार ही मिळून पाच भावंडे. मोठे बंधू अप्पासाहेब पवार, अनंतराव पवार, लहान बंधू प्रताप पवार व एक बहीण सरोज पवार. ही भावंडे आपल्या आईला लाडाने ‘बाई’ म्हणत. १९४० च्या सुमारास बाई पुणे बोर्डवर सदस्या असताना १२ डिसेंबर १९४० रोजी ‘शरद’ नावाचा पुत्ररत्न प्राप्त झाले, बाई या पुत्राला जन्म दिल्यानंतर तिसर्या दिवशी त्या बाळाला उराशी कवटाळून पुणे बोर्डच्या मीटिंगमध्ये उपस्थित होत्या.
वयाच्या २.५ व्या दिवशी राजकारणात पाऊल ठेवणारे शरद पवार देशाच्या राजकारणात पुढे केंद्रस्थान निर्माण करतील, अशी कोणी कल्पना केली नसावी.
१९६७ नंतर बारामतीमधून प्रथम आमदार, त्याच टर्ममध्ये राज्यमंत्री, पुढे १९७८ ला प्रस्थापित काँग्रेसच सरकार पाडून विरोधकांची एकमूठ बांधून वयाच्या ३८ व्या महाराष्ट्र राज्याचे पहिले ‘तरुण मुख्यमंत्री’ म्हणून पुढे आलेले शरद पवार. चारवेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, फक्त सांभाळली न म्हणता आपल्या अमूल्य योगदान आणि दूरदृष्टीतून त्यांनी वेगळी उंची दिली.
गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसोबत राजकीय क्षेत्रात काम करणारे देशातील एकमेव नेते शरद पवार.
१९९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी स्थापन केली. यावेळी रावसाहेब रामराव पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे इ. तरुण नेते साहेबांसमवेत होते.
देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी, पक्षसंघटन या कारणांमुळे आपला बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या विकासाची माळ पुतणे अजित पवार यांच्या गळ्यात घातली. तत्पूर्वी त्यांना बारामतीमधून खासदार, आमदार केलं. ही सुध्दा पवारसाहेबांची दूरदृष्टी होती. त्यांनी अजित पवार यांच्यातला ‘विकासपुरुष’ ओळखला. पुढे फक्त बारामती नव्हे तर राज्यात त्यांना मोठी खाती दिली. मुलगी सुप्रियाकडे असणारी हुशारी, कौशल्य ओळखून त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं.
मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांनी आपापली जबाबदारी उचलून ती यशस्वीपणे पारही पाडली. अर्थातच या दोघांना बाळकडू शरद पवार यांच्याकडून मिळाले आहेत.
शरद पवारांच्या मार्गदर्शनात राज्याच्या राजकरणात अजित पवार सक्रिय झाले. आपल्या वयाच्या नेत्यांची पिढी अजितदादांनी पक्षात वाढवली. पक्षसंघटनेत आपली ताकद दिली, सोबत बारामतीच्या सर्वांगीण विकासाची साहेबांनी दिलेली जबाबदरी हातात घेतली. आपल्या कडक, शिस्तप्रिय, प्रशासकीय पकड या जोरावर त्यांनी कोटींची कामे बारामतीमध्ये आणून ती यशस्वी केली. ही विकासगांगा आजही चालू आहे. आपल्या या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात ‘विकासाचा वादा अजितदादा’ ही प्रतिमा अजितदादांनी निर्माण केली.
सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून केंद्रातूनही बारामतीसाठी निधी मिळत गेला आणि तो आजही मिळत आहे.
राज्यात अजितदादा, केंद्रात सुप्रियाताई अशी बारामतीकरांची एकूण धारणा बनून गेली. हे काही काळ यशस्वीपणे सुरू असताना जुलै २०२३ साली अजिदादांनी वेगळी भूमिका घेवून बहुतांश आमदारांसोबत सत्ताधार्यांशी हातमिळवणी केली. याला खुद्द शरद पवारांनी विरोध दर्शवला. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. (ही फूट पडली की, उभयतांकडून जाणूनबुजून पाडली गेली, हे येत्या विधानसभा निकालानंतर निश्चित होईल)
न्यायप्रविष्ठ प्रकरणात पक्षाच नाव आणि चिन्ह अजितदादांकडे गेलं. दुसर्या बाजूला जेमतेम १५-१६ आमदार, ३ खासदार सोबत असलेल्या शरद पवार गटाला नवीन नाव व नवीन चिन्ह मिळालं.
‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे नवीन चिन्ह होवू घातलेल्या लोकसभा निवडणुका या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून शरद पवार मैदानात उतरले. कमी काळात नवीन चिन्ह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं आणि आपल्या एकूण १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार निवडून आणले. हा एक चमत्कार होता. कारण एकसंघ राष्ट्रवादीला कधी ५-६ च्यावर खासदार निवडून आणता आले नव्हते. या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदा पवार घरातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली; परंतु ही लढत शरद पवार विरुद्ध अजितदादा अशीच होती. ही लढत जनमताच्या पाठिंब्याची होती.
निकालावेळी सुप्रिया सुळे १.५ लाखांहून अधिक मताधिक्क्याने निवडून आल्या. बारामतीकर साहेबांच्या पाठीशी आहेत, असं दिसून आलं असलं तरी सर्वसामान्यांच्या भावना आहे ती ‘केंद्रात ताई आणि राज्यात दादा’. ही परंपरा बारामतीकर खंडित पाडू इच्छित नव्हते. दोन्ही पवार हे समान असून आम्ही दोघांच्या सोबत आहोत. आमच्यासाठी पवार कुटुंबीय हे देवासारखे आहेत, अशी त्यांची भावना आहे. बारामतीसाठी भरभरून देताना पवारसाहेब असो वा अजितदादा असो, देताना कोणीही हात मागे घेतला नाही, पण होवू घातलेल्या राजकीय परिस्थितीत बारामतीच्या जनतेला काही निर्णय घ्यायला भाग पडले.
आज पक्षात फूट पडली असेल, तरीही बारामतीकर प्रामाणिकपणे साहेब, सुप्रियाताई आणि दादांच्या पाठीशी उभा आहे.
बारामतीचा सर्वसामान्य कार्यकर्ता एकच म्हणतोय, आता बस झालं राजकारण, सत्ताकारण. नव्याने पुन्हा एकत्र येवूया, कारण बारामतीची पवार कुटुंबीय ही ओळख ‘एकी’ म्हणून आहे, तिला आणखी तडा जाऊ नाही द्यायचा, ज्या एकीच्या जोरावर समाजकरणात आलो, गाजलो, टिकलो ती एकीच या आजवरच्या यशाच गमक आहे.
– एक बारामतीकर (प्रतिक बनकर)