दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । मुंबई । ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजपने हा कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIAMPLB) तेलंगणाचे शिष्टमंडळ आणि धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री केसीआर यांनी समान नागरी कायद्याला विरोध करावा असे आवाहन बैठकीत करण्यात आले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे. तर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून सरकारवर टीका केली. हा कायदा देशाचे सौंदर्य आणि संस्कृती नष्ट करेल असे त्यांनी म्हटले आहे.
UCC ला विरोध करण्याचे केसीआर यांचे आश्वासन – ओवेसी
“समान नागरी कायदा आपल्या देशाचे सौंदर्य आणि संस्कृती नष्ट करेल. यूसीसी लागू झाल्यास देशातील बहुसंख्याकता संपेल जी चांगली गोष्ट नाही. हा केवळ मुस्लिमांचाच नाही तर ख्रिश्चन समुदायाचाही मुद्दा आहे. पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसला बहुसंख्याकता आवडत नाही जी आपल्या देशाचे सौंदर्य आहे”, असे ओवेसींनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री केसीआर यांनी यूसीसीला विरोध करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाही विरोध करण्याचे आवाहन करणार आहोत. केसीआर यांच्याशी इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले.