दैनिक स्थैर्य | दि. ४ जानेवारी २०२५ | नवी दिल्ली |
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची सुविधा मिळणार आहे. ‘ईपीएफओ’ने देशभरातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टिम (सीपीपीएस) सुरू केली आहे. यामुळे पेन्शन सुरू झाल्यावर पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि रक्कम लगेच खात्यात जमा होईल. देशभरातील ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे केवळ ३ ते ४ बँकांशी स्वतंत्र करार होते.
सीपीपीएस अंतर्गत पेन्शनधारकाने स्थान, बँकेची शाखा बदलली तरीही पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) दुसर्या कार्यालयात हस्तांतरित करावी लागणार नाही. यामुळे निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणार्या पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, या उपक्रमामुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून पेन्शनची रक्कम दरमहा सहज मिळू शकेल.