दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । पुणे । विकास कामांमध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. पुणे येथे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्यवसाय सेमिनार आणि व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोरक्को, नायजेरिया, कोस्टारिका व अझरबैजान या राष्ट्रांचे राजदूत हजर होते. यावेळी अनेक उद्योजकांचा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.
अझरबैजान, कोस्टारिका, मोरोक्को, मलावी आणि नायजेरियाच्या राजदूतांनी त्यांच्या राष्ट्रामध्ये होत असलेल्या औद्योगिक प्रगतीबरोबर विविध कामासंदर्भात सर्व भारतीय उद्योजकांसमोर सादरीकरण केले. तसेच भारतीय उद्योजकांना त्यांचे राष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोनानंतर जग खूप वेगाने जवळ येत आहे.अनेक बदल घडत आहेत. अशा वेळी हे ‘ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड’ देण्यात येत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. उद्योग वाढीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. वातावरण बदल व शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून विकास झाला पाहिजे. सर्वानी आपला विकास हा वातावरणाच्या बदलाची दिशा ओळखून केला पाहिजे. 2030 पर्यंत कार्बन मुक्त जग निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी यावेळी सर्व राजदूतांना विधानभवनात येणेबाबत निमंत्रित केले. तसेच पुणेरी पगडी घालून चारही राजदूतांचा सत्कार करताना त्यांनी पगडी ही वैचारिक प्रगल्भतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.