
स्थैर्य, मुंबई, दि. 04 : जागतिक पर्यावरणदिनाच्या आपणा सर्वांना सर्वप्रथम मन:पूर्वक शुभेच्छा देतो. संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत असताना पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवते आहे. मानवी जीवनात निसर्गाचं आणि निसर्गात वनं, वन्यप्राण्यांचं महत्वं अनन्यसाधारण आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे निसर्गातील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. परिणामस्वरुप ओढे, नाले, नद्या, पाण्याचे स्त्रोत, प्रवाह स्वच्छ झाले आहेत. हवेतील प्रदुषण कमी होऊन मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. स्वच्छ वातावरण मनाला आनंद देत आहे. वन्यप्राण्यांचं दुर्मिळ दर्शन घडू लागलं आहे. निसर्गाचं, पर्यावरणाचं हे स्वच्छ स्वरुप भविष्यात अधिक समृद्ध करायचं आहे. आज किंवा उद्या कोरोनाचं संकट नक्की संपेल. त्यानंतर जेव्हा आपण घराबाहेर पडू त्यावेळी निसर्गाला, पर्यावरणाला नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. वनं, वन्यप्राणी हे वैभव आहे, त्याचं जतन केलं पाहिजे. कोरोनानंतरच्या काळात स्वच्छता, सुरक्षितता वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. त्यावेळी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरंच पर्यावरण स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. ओढे, नाले, नद्या, पाण्यांचे स्त्रोत, हवेचं प्रदुषण होणार नाही याबाबत दक्ष राहिलं पाहिजे. माणसाला जगण्यासाठी पर्यावरणाची किती गरज आहे हे अडीच महिन्यांचा टाळेबंदीच्या काळात अनुभवलं आहे. यातून बोध घेऊन आपण आजचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करुया. पर्यावरण संरक्षण,संवर्धनासाठी कटीबद्ध होऊया.