स्थैर्य, मुंबई, दि. ०5: वांद्रे पश्चिम येथील पाली हिल रेसिडेंट्स असोसिएशन आणि वरळी येथील कॅम्पा कोला सोसायटी परिसरातील रहिवाशांमार्फत सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्राची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक अंतर राखून आणि कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पाली हिल परिसरातील 100 इमारतींमधील रहिवासी आणि घरकाम करणाऱ्या व्यक्तींना तर कॅम्पा कोला इमारत परिसरातील सुमारे 200 कुटुंबांना या केंद्रांमध्ये लस दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त श्री. ठाकरे यांच्या हस्ते यावेळी दोन्ही वसाहतींच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान पाली हिल येथे महानगरपालिकेच्या वतीने अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या ‘ट्री रिस्क असेसमेंट’चे प्रात्यक्षिक मंत्री श्री. ठाकरे यांना दाखविण्यात आले.