स्थैर्य, मुंबई, दि.२८: येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सुरू असलेल्या पर्जन्य जलसंकलनाच्या (रेनवॉटर हार्वेस्टिंग) कामाची आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. नगरसेविका विशाखा राऊत यांच्यासह महापालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.
इथे 35 भूमिगत विहिरी तयार करण्याचे आणि पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात फारसे पाणी साचणार नाही. तसेच मैदानाच्या देखभालीसाठी लागणारी पाण्याची गरज भागेल व धुळ कमी होऊन मैदान परिसर हिरवागार राखण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. तसेच चैत्यभूमीजवळ पावसाळी पाण्यासाठी असलेल्या आऊटफॉल पॉईंटच्या जागेला अर्बन स्पेसमध्ये रुपांतरित करण्याचे काम सुरू आहे. या कामाचीही मंत्री श्री. ठाकरे यांनी आज पाहणी केली. दरवर्षी लाखो नागरिक या स्थळाला भेट देतात. त्यांना सुंदर जागा उपलब्ध व्हावी असा प्रयत्न आहे, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळादरम्यान झाड पडून दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्या वरळी बीडीडी चाळ येथील संगीता खरात यांच्या वारसांना राज्य शासनातर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज देण्यात आली. मंत्री श्री. ठाकरे यांनी मृताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदत सुपूर्द केली.
नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या प्रयत्नातून वॉर्ड क्र. 197 मध्ये नूतनीकरण केलेल्या जिजामाता नगर दवाखाना आणि आरोग्य केंद्राचे मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, माजी राज्यमंत्री सचिन अहीर, नगरसेवक आशिष चेंबुरकर, माजी आमदार सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नाने वरळी कोळीवाडा येथे गरजूंसाठी शिवभोजन केंद्र सुरू झाले. खासदार श्री. सावंत यांच्या उपस्थितीत मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.