पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एसटीपी प्रकल्पाचे कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । नांदेड । पर्यावरणाच्या दृष्टीने सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच नगरात असे प्रकल्प नसल्याने ते पाणी थेट जवळ असलेल्या नदी-नाल्यात जाऊन मिसळते. जलस्त्रोतांचे प्रदूषण जर रोखायचे असेल तर एसटीपी प्रकल्पाशिवाय चांगला पर्याय नाही, असे प्रकल्प जागोजागी व्हावेत, असे सांगून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एसटीपी प्रकल्पाचे कौतुक केले.

नांदेड महानगराच्या नागरी वस्तीतील सांडपाणी प्रक्रियेविना थेट नदीत जाऊन मिसळू नये या उद्देशाने नांदेड महानगरात उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रकल्पाची पाहणी आज राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष केली. यावेळी त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रकल्पाबाबत मंत्री महोदयांना माहिती दिली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे वाडी बु. येथील नांदेड उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त आले होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी आवर्जून या प्रकल्पाची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महानगरपालिकेचे कौतुक केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याने मनपाला सूचना करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरात एक सर्वेक्षण करून प्रदूषित होणाऱ्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प याची स्थान-निश्चिती केली. त्यामध्ये नऊ ठिकाणी हे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अवघ्या दहा महिन्यात त्यांची उभारणीही झाली.

नांदेड शहरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, माता गुजरीजी विसावा उद्यान, स्नेहनगर पोलीस वसाहत, अबचल नगर वसाहत, असर्जन परीसर अशा नऊ प्रकल्पांमधून आजघडीला प्रक्रिया केलेले 2 हजार 210 केएलडी पाणी उपलब्ध होत आहे. आणखी नऊ प्रकल्पांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून त्याद्वारे 2 हजार 700 केएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रक्रिया करून उपलब्ध झालेल्या या पाण्याचा वापर स्वच्छतागृहात फ्लश करण्यासाठी, तसेच विसावा उद्यानातील झाडांची जोपासना करणे, परीसराची स्वच्छता करणे, बांधकाम, ड्रेनेज लाईन साफ करणे यासाठी हे पाणी वापरले जात आहे. यामुळे महापालिकेच्या शुद्धीकरण केलेल्या पाण्याची या कामासाठीची मागणी कमी झाली आहे. तसेच महत्वाचे म्हणजे हे अशुद्ध पाणी नदीत मिसळणे थांबल्यामुळे गोदावरी नदीच्या जलप्रदूषणात घट झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!