दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । मुंबई । केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मुंबईतील दुसरा मेट्रो मार्ग मार्चमध्ये कार्यान्वित करू, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार होत असलेल्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यानच्या तयार मुंबई मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन आज पार पडली. आरे, दिंडोशी आणि कुरार या मेट्रो स्थानकदरम्यानच्या कामाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. यामधील वर्सोवा ते घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईत सर्वत्र मेट्रोमार्गाचे जाळे तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून मेट्रो मार्ग 7 चा पहिला टप्पा येत्या मार्च महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी आज केली.
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यान तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो 7 चा पहिल्या टप्याची ट्रायल रन आज घेण्यात आली. हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असून ती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. मार्च महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून आरे ते डहाणूकरवाडी असा मेट्रोचा 20 किलोमीटर लांबीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आज आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरे, दिंडोशी, कुरार अशा तीन स्थानकांदरम्यान ट्रायल रन घेऊन यावरील कामाची पाहणी केली. या मेट्रोमार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यादरम्यान सेवा सुरू करता येणे शक्य असल्याबाबत त्यांचे एकमत झाले. एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी झालेल्या कामांची माहिती त्यांना दिली. या ट्रायल रन नंतर बोलताना त्यांनी झालेली कामे समाधानकारक असून आता फक्त परवानगीची प्रक्रिया पूर्ण करणे बाकी असल्याचे सांगितले. ती प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण करून मुंबईतील दुसऱ्या मेट्रो मार्गाचा एक टप्पा सुरू करणे आपल्याला शक्य होईल असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आज झालेल्या या ट्रायल रनच्या वेळी राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आणि आमदार रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे सर्व अधिकारी, अभियंते आणि मेट्रो मार्गावर काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.