
स्थैर्य, पुणे, दि. 24 डिसेंबर : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि वाचक यांचा समन्वय साधणे गरजेचे असते. सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा समन्वय खर्या अर्थाने साधला जाणार आहे. संमेलनाच्या मुख्य मंडपात प्रवेश करण्याच्या मार्गावरच ग्रंथ दालने साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत.
साहित्यिक साहित्यकृती निर्माण करतो, परंतु त्याचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रकाशक आणि विक्रेते महत्वाचा दुवा ठरतात. लेखकाच्या विचार, कल्पना आणि अभ्यासातून निर्माण झालेली साहित्यकृती जेव्हा वाचकांपर्यंत पोहोचते तेव्हा वाचक चांगल्या साहित्यकृतीला न्याय देतो आणि समीक्षकाची भूमिका देखील घेतो. चांगल्या वाचकांमुळेच समाजात वाचन परंपरा रुजते.
वर्षानुवर्षे सातार्यात ग्रंथ संमेलने भरविली जात असल्याने सातारकरांमध्ये वाचन संस्कृती रुजलेली आहे. त्यामुळे सातारकर या अनोख्या संकल्पनेला भरभरून दाद देतील, असा विश्वास ग्रंथ दालन समितीच्या प्रमुख सुनिताराजे पवार यांनी व्यक्त केला.
संमेलनस्थळांपासून ग्रंथ, पुस्तक विक्रेत्यांची दालने दूर असल्याने अनेक संमेलनांमध्ये विक्रेत्यांची कुचंबणा होत असे. वाचक ग्रंथ दालनांकडे फिरकत नसल्यामुळे पुस्तक विक्रीवर परिणाम होत असे व विक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडत असे. सुयोग्य नियोजनाअभावी प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, स्टॉलवरील कर्मचारी यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
वर्षानुवर्षे आलेल्या अडचणी लक्षात घेऊन संमेलनाच्या संयोजकांनी या वेळी ग्रंथ, पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांची आबाळ होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना केल्या आहेत. संमेलन मंडपाची अशाच पद्धतीने उभारणी करण्यात येत आहे ज्या योगे संमेलनस्थळी येणारे साहित्यरसिक ग्रंथदालनातूनच मुख्य मंडपात प्रवेश करतील. प्रकाशक, विक्रेते यांच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्थाही स्वतंत्रपणे करण्यात आली असल्याचे सुनिताराजे पवार यांनी सांगितले.
गाळ्यांची सोडत शनिवारी पुण्यात
या विषयी माहिती देताना पवार म्हणाल्या, संमेलनस्थळी नऊ फूट बाय नऊ फूट आकाराचे जर्मन हँगर पद्धतीचे 254 गाळे असून यातील 242 गाळ्यांची नोंदणी झाली आहे. 12 गाळे शासन आणि परिषदेच्या संलग्न संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नोंदणी झालेल्या गाळ्यांची सोडत शनिवार, दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात काढण्यात येणार आहे.

