फलटण शहरात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री; रस्त्यांना तळ्याचे स्वरूप, नागरिकांची त्रेधातिरपीट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० जून २०२३ | फलटण | मान्सून केरळात दाखल होताच आज फलटण शहरात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री झाली. सुमारे एक तास शहरात पाऊस बरसला. मात्र, या पावसाने फलटण शहरामधील रस्त्यांची दूरवस्था पुन्हा एकदा नागरिकांना पाहायला मिळाली. या एका तासाच्या पावसामुळे फलटण शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. फलटण नगरपरिषद कायमच शहरातील विविध रस्त्यांची कामे करत असते; परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे शहरातील नागरिकांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वार्‍याने फलटण शहरासह परिसराला झोडपून काढले होते. त्यानंतर फलटण शहरामधील रस्त्यांलगत असणारे वृक्ष हे रस्त्यावर पडल्याने नागरिकांना त्यावेळी सुद्धा अडचणींना सामोरे जावे लागले होते. आज झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे फलटण शहरातील सर्वच रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे शहरातील नागरिक पुन्हा एकदा नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

दरम्यान, आगामी काही दिवसांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा फलटण येथे मुक्कामी येणार आहे. यावेळी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विविध मंत्री हे पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी फलटणमध्ये येत आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात जर पावसाचे आगमन झाले तर शहरात असणार्‍या रस्त्यांची दूरवस्था ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे व त्याचा सामना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने येणार्‍या लाखो वारकर्‍यांना करावा लागणार आहे.


Back to top button
Don`t copy text!