
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : येथील मुधोजी महाविद्यालयात वाणिज्य विभाग, उद्योजकता कौशल्य विकास समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने तीन दिवसीय ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यशाळेत ११६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेत ‘नादब्रम्ह’चे संस्थापक दत्तात्रय निडवंचे यांनी १० रुपयांमध्ये इडली-सांबर विकून जागतिक ब्रँड कसा तयार केला, यावर मार्गदर्शन केले. तसेच, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (MCED) प्रकल्प अधिकारी शीतल पाटील, सुरेश उमप, योगेंद्र सातपुते आणि दिगेश गावडे यांनी यशस्वी उद्योजकाची गुणवैशिष्ट्ये, व्यावसायिक व्यवस्थापन आणि प्रकल्प अहवाल यावर मार्गदर्शन केले.
MCED सोबत ३ वर्षांचा सामंजस्य करार
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि MCED, सातारा यांच्यात ३ वर्षांसाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी, “विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून इतरांना रोजगार द्यावा,” असा सल्ला दिला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. सागर निकम, सहसमन्वयक प्रा. ललित वेळेकर यांच्यासह वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.