उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा -डॉ. विजयकुमार गावित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२३ । नंदुरबार । दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ (जिमाका वृत्त ) नंदुरबार हा आदिवासी बहुल व दुर्गम असा जिल्हा असून इथल्या तरूणाईमध्ये असाधारण स्वरूपाची कौशल्ये आहेत, या कुशलतेला उद्योजकांनी भरघोस सॅलरी पॅकेज देवून अर्थिकदृष्ट्या योग्य सन्मान करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, विजय चौधरी, प्राचार्य- सचिन पाबळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सह आयुक्त विजय रिसे, संगीता सोनवणे, काजल मच्छले आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शासनाच्या विविध विभागांमार्फत युवकांना कौशल्य विकासांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या खाजगी उद्योगांमध्ये रोजगारही मिळतो, परंतु काही दिवसानंतर हे तरुण पुन्हा परत आलेले दिसतात. यांचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कुशलतेच्या तुलनेत अथवा उद्योगांनी ठरल्याप्रमाणे वेतन न देणे हे आहे. मोठ्या शहरांमध्ये अल्प वेतनावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत जिकिरीचे असते, त्यामुळे युवकांच्या कुशलतेचा अर्थिकदृष्ट्या योग्य सन्मान उद्योजकांनी केल्यास कुशल युवक व उद्योग दोघांचेही भवितव्य सुरक्षित राहू शकते, असे सांगून आदिवासी विकास विभागाच्या रोजगार व करिअर विषयक विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

खडतर संघर्षानंतरचा आनंदाचा क्षण-डॉ. सुप्रिया गावित

संघर्षातून शिक्षण घेत रोजगार मिळविण्यापर्यंतचा प्रवास युवकांसाठी अत्यंत खडतर असतो. रोजगारासाठी मुलाखत हा क्षण प्रत्येक युवकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. तसेच रोजगार मिळाल्यानंतर पहिला पगार मिळणे हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो, असे सांगून जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक युवक नंदुरबारचा ब्रँड ॲम्बेसेडर- डॉ. हिना गावित

नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासातील शासकीय पातळीवर होणारा हा सर्वात मोठा रोजगार मेळावा असून येथील प्रत्येक तरूण मोठमोठ्या शहरांमध्ये नंदूरबारचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून भविष्यात काम करणार आहे. आज येथे २५ कंपन्यांनी सहभाग घेतला असून भविष्यात अजून मोठे रोजगार मेळावे घेण्याचेही आवाहन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

दृष्टिक्षेपात रोजगार मेळावा…

✅ १५०० पेक्षा जास्त पदांकरिता जागेवरच मुलाखत आणि नियुक्ती

✅ रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी

✅ स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती.

✅ नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे गुजरात मधीत नामांकित २५    कंपन्याचा सहभाग

✅ दहावी, बारावी, पदवी, पदविका, अॅग्रिकल्चर पदवी / पदविका अभियांत्रिकी शिक्षण, आय. टी. आय. धारकांचा मोठा सहभाग

✅ सर्व प्रकारच्या पात्रता धारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध


Back to top button
Don`t copy text!