स्थैर्य, सातारा दि. 15 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे जिल्ह्यातील उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे परप्रांतीय मजुर आपापल्या राज्यात गेले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत, पण त्यांना कुशल कामगारांची कमतरता भासत आहे, तरी जिल्ह्यातील उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज केले.
जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, सहायक आयुक्त कौशल्य विकास सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन करुन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई पुढे म्हणाले, एमआयडीसींमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कामावर होते ते आता आपल्या राज्यात निघून गेले आहे त्यांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर लवकरच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घेऊन बैठक घेतली जाईल व जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
एमआयडीसीतील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल. 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगांना कुशल कामगार मिळतील. कामगार विभागाने व उद्योग विभागाने उद्योगांना किती कुशल कामगारांची गरज आहे याची नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या.