दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । सातारा । जिल्ह्यातील नवउद्योजकांनी जिल्ह्यातीलच यशस्वी उद्योजकांचा आदर्श व मार्गदर्शन घेऊन आपला व्यवसाय उद्योग सुरु करावा, प्रशासनामार्फत त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, व युथ एड फाउंडेशन संस्था,यांच्यामार्फत राज्यव्यापी उद्यमिता यात्रा 2022 आज सातारा जिल्हयात आली त्यावेळी आयोजित कार्यक्रमाच्यावेळी श्री. शेखरसिंह बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनील पवार , भा.भ.वि.वि. व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष भाईशैलेंद्र माने, सोशल वर्क महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शाली जोसेफ ,युथ एड फाऊंडेशनचे मॅथ्यू मत्तम, उद्यमिता यात्रेचे राज्य समन्वयक मनोज भोसले , कार्यक्रम समन्वयक प्रा. जिवन बोराटे ,काजल गायकवाड ,महिला बचत गटांच्या सदस्या व नवउदयोजक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले,जिल्ह्यात आलेल्या उद्यमिता यात्रेचा नव उद्योजक प्रशिक्षणार्थीना निश्चितच लाभ होईल .नवउद्योजक प्रशिक्षणार्थीनी समूहाने किंवा बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित येऊन व्यवसाय उद्योग सुरु करावा म्हणजे यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते तसेच उद्योग व्यवसायांच्या द्ष्टीने फायदेशीर असते. गडचिरोली सारख्या भागात महिला बचत गटांनी चांगले काम केले आहे.आपल्या जिल्ह्यात ही काही बचत गट व महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू ठेवला आहे. अशा आपल्या जिल्ह्यातीलच यशस्वी उद्योजक व्यवसायाचा आदर्श व मार्गदर्शन घेऊन नवउद्योजक प्रशिक्षणार्थीनी आपला उद्योग व्यवसाय सुरू करावा. प्रशासनामार्फत त्यांना आवश्यक ते पूर्ण सहकार्य केले जाईल, असे ही श्री सिंह यांनी यावेळी सांगितले.
उद्यमिता यात्रा : महिला व युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी , युथएड फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा यांनी संयुक्तपणे सातारा जिल्ह्यामध्ये 18 जून २०२२ पासून उद्यमिता यात्रेचे आयोजन केले होते .या उद्यमिता यात्रेची सातारा जिल्ह्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी हे महाविद्यालय पार पाडीत आहे .उद्यमिता यात्रेनिमिताने आज 18 जून रोजी मोटार/दुचाकी रॅली आयोजित केली होती .या उद्यमिता यात्रेचे सातारा जिल्ह्यासाठीचे उद्घाटन नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह ,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले .
ही उद्यमिता यात्रा 10 मे 2022 ते 20 जून 2022 या कालावधीत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचा प्रवास करत आहे. मंत्रालयातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवून ती १० मे रोजी रवाना झाली असुन उद्यमिता यात्रेदरम्यान उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन संबंधित गावांमध्ये केले आहे .यासाठी गावातील महिलांचे उद्योजकता बाबत सर्वेक्षण करून प्रशिक्षण आयोजित केले आहे .
सातारा जिल्ह्यातील महिला व युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून सुमारे 600 युवक व महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.तसेच त्यांचे लघु उद्योग उभे करून दिले जाणार आहेत.