दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । मुंबई । उद्योजकांनी व्यापार, व्यवसाय व उद्योग करताना केवळ अधिक नफा हे उद्दिष्ट न ठेवता व्यवसायाला नैतिक व शाश्वत मूल्यांची जोड द्यावी तसेच देश व समाजाप्रती आपली बांधिलकी जपावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना राज्यपालांच्या हस्ते बुधवारी (दि. 20) मुंबई येथे ‘साई बिझनेस क्लब गाला‘ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका डॉ कृती वजीर, सदस्य ऋत्विज म्हस्के, डॉ दलिप कुमार, डॉ एच एस रावत, जयेश जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आज जग भारताकडे मोठ्या आशेने व अपेक्षेने पाहत आहे. अश्यावेळी आपण सिद्धांत घेऊन व जीवन मूल्ये सांभाळून व्यवसायात वाटचाल केली तर नफा व आनंद दोन्ही प्राप्त होतील. नवउद्योगात महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘इंडियाना – द कल्चरल बिझ‘ या उद्योग व संस्कृतींना जोडणाऱ्या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली.
कोरोनाच्या ऐन मध्यावर केवळ आठ उद्योजकांच्या सहकार्याने साई बिझनेस क्लबची स्थापना झाली असून आज 100 पेक्षा अधिक व्यावसायिक व उद्योजक क्लबशी जोडले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
राज्यपालांच्या हस्ते डॉ. दलिप कुमार, डॉ. हिना विजय ओझा, डॉ. समीर नन्नावरे, आचार्य सोनाली लोटलीकर व रोहन लोटलीकर, डॉ. दीपक राऊत, शशांक जोशी, डॉ. नागेंद्र दीक्षित, वास्तू तज्ज्ञ कल्पेशसिंह चौहान, विजय जिनवाला, तस्नीम मोर्कस, डॉ. कलाश्री बर्वे, डॉ. मंगेश बर्वे, सचिन गायकवाड, डॉ.अतुल डाकरे, डॉ. अलोक खोब्रागडे, ऋत्विज म्हस्के, पियुष पंडित, एच एस रावत, प्रिया श्रीमनकर, जयेश जोशी आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.