दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योजकता विश्वात टिकून राहायचे असेल तर खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रातील संधी निश्चितच आजच्या विद्यार्थ्यांकरिता वरदान आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आव्हान शिरवळ येथील उद्योजिका सौ. सारिका जगताप यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व उद्योजकता विकास कक्ष (Entrepreneurship Development Cell) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय ‘अन्न प्रक्रिया उद्योगातील उद्योजकीय संधी’ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या पुढे असेही म्हणाल्या की, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील प्रारंभीचे अडथळे, भांडवल तसेच पायाभूत सोयी – सुविधांचा तुटवडा व मनुष्यबळाची कमतरता या समस्यांवर समर्थपणे व आत्मविश्वासाने मात केली तर कोणत्याही व्यावसायात आपण यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सिद्धी प्रेरणा व जोखीम स्वीकारण्याची मनोधारणा विकसित केली पाहिजे. तरच आपण उद्योग विश्वात आपले स्थान भक्कम करू शकतो. खाद्य पदार्थ निर्मिती क्षेत्र हे सर्वांकरिता मुक्त क्षेत्र असून आरोग्यसाठी लाभदायक व पौष्टिक पदार्थांची निर्मिती करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला तर जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधीचा फायदा घेऊन उद्योजक विश्वात स्वतःचा असा ब्रँड निर्माण करावा व नावलौकिक मिळवावा असे आवाहन केले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना बोराटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रास्ताविक प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संजय दीक्षित, अग्रणी महाविद्यालय योजना चे समन्वयक प्रा. सौ. रुक्मिणी भोसले, प्रा. मोनिका शेंडे, प्रा. सुप्रिया जळक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार प्रा. ललित वेळेकर यांनी मानले. सूत्र-संचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले.