उद्योजक राम निंबाळकर यांचा निंबळक गावातील शाळांना मदतीचा हात; भौतिक सुविधांसह रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावणार


स्थैर्य, निंबळक, दि. १७ सप्टेंबर : निंबळक गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. राम निंबाळकर यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा आणि न्यू इंग्लिश माध्यमिक स्कूल येथे सदिच्छा भेट देऊन शाळांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रथम त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन स्थानिक स्कूल कमिटी सदस्यांसोबत प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधला. वर्गखोल्यांमधील भौतिक सुविधांची पाहणी करून ज्या काही कमतरता आहेत, त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कमिटीला दिल्या. तसेच, शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राखण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर श्री. राम निंबाळकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलला भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी चर्चा करून विद्यालयातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न समजून घेतला. रिक्त पदे संस्थेकडून भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन देतानाच, त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. रिक्त पदावर तात्पुरते अध्यापन करणाऱ्या श्री. गंगावणे या शिक्षकांचे मानधन पालकांकडून न घेता, ते स्वतः देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आपल्या गावातील शाळा उच्च दर्जाच्या असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत श्री. निंबाळकर म्हणाले की, चांगल्या शाळांमधूनच सुसंस्कारित आणि सुजाण नागरिक घडतात. यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल, ती पुरवली जाईल. तसेच, त्यांनी गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत निंबाळकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. राजाराम भोसले यांना शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

यावेळी श्री. संजय कापसे, श्री. काशिराम मोरे, श्री. जयराम मोरे, श्री. शिवाजी पिसाळ, श्री. अमोल निंबाळकर, श्री. श्रीकांत निंबाळकर, श्री. विकास भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. वैभव निंबाळकर व अन्य सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!