
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लक्ष्मीनगर आणि बिरदेवनगर या दोन्ही शाखांमध्ये आज श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणपती बाप्पाचे आगमन अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाले. शाळेच्या परिसरात सकाळपासूनच आकर्षक सजावट आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी मंगलमय वातावरण निर्माण केले होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर वाजतगाजत गणपती बाप्पाचे स्वागत केले. या आगमन सोहळ्यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैशाली शिंदे यांनी ‘श्रीं’चे औक्षण केले. त्यानंतर मंत्रोच्चाराच्या गजरात शाळेचे सेक्रेटरी श्री. निखिल यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. महाआरतीच्या गजराने आणि गणेश भजनांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
या सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैशाली शिंदे, डायरेक्टर श्री. शिवराज भोईटे, सेंटर हेड सौ. सुचिता जाधव यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना उकडीच्या मोदकांचा प्रसाद वाटप करण्यात आला.
या उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरांचे महत्त्व आणि एकात्मतेची शिकवण मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते, ज्यामुळे हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.