
स्थैर्य, गिरवी, दि. १० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील गिरवी आणि परिसरातील गावांमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात, पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणींनी भवानीमाता मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
गिरवी भागातील अनेक गावांमध्ये श्रावण पौर्णिमेला भावाला राखी बांधल्यानंतर भवानीमातेच्या मंदिरात जाऊन ‘भाऊराया सुखी राहू दे’ अशी प्रार्थना करण्याची एक अनोखी परंपरा आहे. गिरवी आणि दुधेबावी येथील भवानीमाता मंदिरात दर्शनासाठी परिसरातील अनेक माहेरवाशिणी महिला श्रद्धेने येतात.
राखी पौर्णिमा आणि भवानीमाता मंदिर देवदर्शन हा एक संयुक्त सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव म्हणून या भागात अनेक वर्षांपासून वंशपरंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. या निमित्ताने वर्षातून एकदा तरी माहेरवाशिणी आपल्या मूळ गावी येतात, ज्यामुळे कौटुंबिक स्नेहबंध अधिक घट्ट होतात.
विशेष म्हणजे, गिरवी आणि दुधेबावी येथील भवानीमाता मंदिरात सन २००३ सालापासून प्रत्येक पौर्णिमेला मोफत अन्नदान म्हणजेच महाप्रसादाचे आयोजन अखंडपणे केले जाते, याचा लाभही अनेक भाविकांनी घेतला.