संस्थात्मक अलगीकरण करताना आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश : कोविड-१९ बाबत सावली तालुक्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

स्थैर्य, चंद्रपूर, दि. 23 : सावली तालुक्यामध्ये कोरोना आजारासंदर्भात आतापर्यंत केलेल्या उपायोजना सकारात्मक आहेत. मात्र संस्थात्मक अलगीकरण करताना नागरिकांना प्राथमिक सुविधा तसेच त्यांना एकाकीपणा येणार नाही, याची खातरजमा करा, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

आपल्या पाच दिवसीय दौऱ्यामध्ये गडचिरोली येथून पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यामध्ये आल्यानंतर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मूल उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, नगराध्यक्ष विलास यासलवार, सभापती विजय कोरेवार, तहसीलदार पुष्पलता कुंभरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी, पोलीस निरीक्षक राठोड, उपविभागीय अभियंता सी.बी.कटरे,  दिनेश चिरुनवार, आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती प्रत्येक तालुक्यातील सकारात्मक पाठबळामुळे उत्तम आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या घरात गृह अलगीकरण होणे शक्य नसते. अशावेळी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवताना आवश्यक प्राथमिक गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. सोबतच नागरिकांनी देखील कोरोना आजारापासून त्यांचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागत असल्यामुळे, संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असल्याचे समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरोग्य विभागाने तालुक्यातील कोरोना संदर्भातील उपाययोजनेचा आढावा सादर केला. सावली तालुक्यामध्ये संस्थात्मक अलगीकरण, गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांची माहिती देण्यात आली. तालुक्यांमध्ये आतापर्यंत संशयित असणाऱ्या ५९ लोकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह  असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यामध्ये आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची गावागावांमध्ये नोंद घेतली जात असून ग्रामस्तरावर सरपंच व आशा वर्कर यांच्यामार्फत यासाठी मदत मिळत असल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने पालकमंत्र्यांना दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा देखील आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुक्यांमध्ये सुरू असलेले रस्त्यांचे खडीकरण, याबाबतही आढावा घेतला गेला. तालुक्यामध्ये जवळपास ३५ खडीकरणाची कामे प्रलंबित असून ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था संदर्भातही यावेळी पालकमंत्र्यांनी जाणून घेतले. अवैध दारू विक्री संदर्भात येत असलेल्या तक्रारींचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील अनेक भागातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याबाबतही तक्रारी आहेत. याकडे पोलिसांनी गंभीरतेने लक्ष वेधावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

सावली शहरातील नगरपंचायती अंतर्गत असणारी कामे, प्रलंबित आराखडे घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित सभागृहाचे काम, याकडे देखील लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. सावली येथे महात्मा गांधी यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा एक भव्य पुतळा उभारण्याचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भात तातडीने आराखडा सादर करून आवश्यक सौंदर्यीकरण व त्यांच्या सावली येथील भेटीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने मांडणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावली भागातील काही विकास कामांसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याचे काम करावे. यासाठी शाळांचे वॉल कंपाऊंड बांधण्याची कामे मंजूर करण्यात आली असून ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुक्याच्या विकासासंदर्भातल्या प्रलंबित कामांना गती देऊन पूर्ण करण्याचे देखील यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनीही काही सूचना केल्या. या सूचनांना गंभीरतेने घेत योग्य प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!