ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा द्यावा – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरण ची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मंत्री व आ. आशीष शेलार , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी यावेळी नवी मुंबईत वाशी येथे सोमवार ६ डिसेंबर रोजी महावितरण चे अधिकारी एका बैठकीत महावितरण च्या कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी ‘वरून दबाव ‘ आहे तसेच या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल, मदत न केल्यास त्याचेही ‘फळ’ मिळेल अशा भाषेत महावितरण चे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी  कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब ही विचारला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजीवांना निवडणुकीत कसे साह्य करावयाचे आहे याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे श्री . पाटील यांनी नमूद केले.

श्री. पाटील यांनी सांगितले की, वाशी येथील घटनेतून महावितरण ची यंत्रणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला.


Back to top button
Don`t copy text!