स्थैर्य, आजमगड, 20 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. पण, आता उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशमधील बसगावमध्ये मागस वर्गात सरपंचाची हत्या झाली होती. या सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे आज सकाळी ठरल्यामुळे कारने रवाना झाले होते. परंतु,आजमगड सीमा भागात पोहोचल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले. नितीन राऊत यांना आजमगडमध्ये येण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटकाव केला. त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली.
पोलिसांनी अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहे. बसगावला जाऊ द्यावे, अशी मागणी काँग्रेस समर्थकांनी केली. त्यानंतर बऱ्याच वेळ हे आंदोलन सुरू होते. अखेर त्यानंतर नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्ते हे पायीची उत्तर प्रदेशकडे निघाले. त्यामुळे पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
नितीन राऊत यांचावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे युपी पोलीस आणि राज्य सरकार असा वाद पेटण्याची चिन्ह आहे.