![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/Lonand.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२५ | फलटण | लोणंद मधील लोणंद – सातारा, लोणंद शिरवळ, लोणंद – खंडाळा या रस्त्यांवरील तसेच शासकीय जागांवरील अतिक्रमणे सोमवारी बुलडोझरने हटविण्यात आली. या मोहिमेत सुमारे २०० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त झाली. या कारवाईवेळी व्यावसायिक व अधिकार्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या कारवाईसाठी अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
लोणंद शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिक्रमणांमुळे गंभीर झाला होता. त्यामुळे लोणंद नगरपंचायतीने पुढाकार घेत ही अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळीच अधिकारी व कर्मचारी जेसीबी, डंपर व इतर मशिनरींचा फौजफाटा घेवूनच रस्त्यावर उतरले होते. लोणंद नगरपांचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व कर्मचारी, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, चेतन मोरे, सपोनि सुशील भोसले, भूमी संपादन समन्वयक अधिकारी लक्ष्मण पाटील, एनएचएआयचे पंकज प्रसाद, शाखा अभियंता पी.डी. मस्तुद, तलाठी शशिकांत वणवे यांनी यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू झाली.
ही अतिक्रमणे शिरवळ चौकातूनच हटवण्यास सुरूवात झाली. शिरवळ रोड, खंडाळा रोड, सातारा रोड या मार्गावर ही मोहीम राबवून वाहतुकीला अडथळा ठरणारी खोकी, टपरी, गाडे, बोर्ड, शेड, हटवण्यात आले. केवळ मुख्य रस्तेच नव्हे तर शासकीय जागेवर करण्यात आलेलीही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या मोहिमेत शिरवळ व सातारा या दोन्ही रस्त्याच्या बाजूला असणारे दिशादर्शक फकही हटवण्यात आले. याच फलकांचा आधार घेवून अनेकजणांनी अतिक्रमण केले होते.