दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२३ । वसमत ।
वसमत तालुक्यातील धामणगाव येथे राहण्याऱ्या कांबळे परिवाराची दहा-बारा एकर बागायती शेती व शेतामधील आलिशान घर हे काही जातीयवादी समाजकंटकाच्या डोळ्यात खुपत असल्याने त्यांनी कांबळे यांच्या घराकडे व शेताकडे जाणारा रस्ता खोदून अडवला होता.
सदर घटनेची बातमी कर्तव्यदक्ष व दलित बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या रिपब्लिकन सेनेचे मुंबई जिल्हाध्यक्ष भगवान साळवी यांच्यापर्यंत मिडिया व सोशल मिडियाद्वारे पोहोचली असता त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता हिंगोली रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांना बातमी फॉरवर्ड करून सदर प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले, रिपब्लिकन पक्षाचे धडाकेबाज युवनेता किरण घोंगडे यांनीही तत्परतेने पत्रकार व कार्यकर्ते सोबत घेऊन वसमत तहसीलदार यांना बौद्धवस्तीकडे जाणारा रस्ता त्वरित मोकळा करा अन्यथा आम्ही “बिऱ्हाड आंदोलन” करू असा कडक इशारा दिला. सदर प्रसंगी तहसीलदार साहेबांनी ही वेळ न दवडता जेसीबीद्वारे रस्ता खुला करून जातीयवादी समाजकंटकांच्या नीच मनोवृत्तीला जोरदार चपराक दिली त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातुन तहसीलदार साहेबांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे.
बौद्धवस्तीकडे जाणारा रस्ता मोकळा होऊन कांबळे परिवाराला न्याय मिळाल्यामुळे रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनीही पुकारलेले बिऱ्हाड आंदोलन स्थगित केले असून प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुंबई जिल्हाध्यक्ष भगवान साळवी यांनी तत्परतेने त्याना सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे सूचित केल्याबद्दल त्यांनी भगवान साळवी यांचे आभार व्यक्त केले.