दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । सातारा । सातारा पालिकेने मंगळवारी शाहू चौकातील अजिंक्य मटण शॉप बगाडे हॉस्पिटल या दरम्यानची अतिक्रमणे हलवली. अतिक्रमण मोहिमेदरम्यान टपरीधारक आणि पालिकेचे कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, अतिक्रमण विभागाने कोणालाही न जुमानता धडक कारवाई केल्याने शाहू चौक ते महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला.
सातारा शहरांमध्ये मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव विभागाने धडक कारवाया सुरू केल्या आहेत. सोमवारी हुतात्मा उद्यान परिसर साफ केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून शाहू चौकात मोहिमेला प्रारंभ झाला. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्यासह वीस कर्मचारी एक जेसीबी दोन टिपर अशी यंत्रणा कामाला जय्यत तयार होती. या चौकामध्ये काही टपऱ्यांची झालेली अतिक्रमणे वाहतुकीला अडचणीची ठरत होती. यासंदर्भात लोकशाही दिनामध्ये तक्रारी झाल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ही अतिक्रमण हटविण्याचे तातडीचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार प्रशांत निकम यांनी ही सर्व टपऱ्यांची अतिक्रमणे हटवली. यावेळी कोणत्याही दबावाला आणि फोनाफोनीला भीक न घालता पालिकेने धडाक्यात सर्व टपऱ्या उचलून नेल्या. टपरीचालक आणि पालिकेचे अधिकारी प्रशांत निकम यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र] निकम यांनी आक्रमक पवित्रा घेताच संबंधितांचा सूर नरमला. यानंतरही सदर बाजार गोडोली एसटी स्टँड परिसर राधिका चौक या ठिकाणी या पुढील दिवसांमध्ये कारवाई करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या दरम्यान कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले.