दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । जिहे कटापूर जलसिंचन योजनेच्या मालकीच्या 11 एकर जमिनीवर जरंडेश्वर साखर कारखान्याने अतिक्रमण करून वॉल कंम्पाउंड, रस्ते तसेच पक्के बांधकाम केले असून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा उच्च न्यायालदयात दाद मागू असा इशारा भाजपच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव कांबळे यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेत चिमणगांव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालकीची गट क्र. 795 पैकी 80 आर व गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि. मुबई यांच्या मालकीची गट क्र..808 पैकी 75 आर जमीन शासनाने राजपत्राने संपादीत केली. शिवाय अन्य 5 शेतकरी याची एकूण 10 एकर 13 आर जमीन संपादीत केली आहे. दि. 23 ऑक्टोबर 2012 रोजी नोंदी मंजुर झाल्या आहेत. या क्षेत्राचे कब्जेपट्टी दि. 10 जुलै 2015 रोजी झाली आहे. या संपादीत क्षेत्रावर जरडेश्वर साखर कारखान्याने दंडेलशाहीने 20 फुट उंचीचे वॉल कंपाऊड करून पक्के बांधकाम, ऊस वाहतुकीस रस्ता केला आहे. यासाठी अंदाजे 5 ते 6 लाख ब्रास डबर, मुरूम याचे बेकायदेशीर उत्खनन करून रॉयल्टीपोटी मिळणारा शासनाचा कोट्यवधीचा महसुल बुडवला आहे.
सातारा येथील जलसिंचन कार्यालयात चौकशी केली असता जरडेश्वर साखर कारखान्याने नुकसान भरपाई घेतली नाही असे सांगितले जाते. तथापि, अधिक चौकशी केली असता शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई मान्य नाही तर अधिक मोबदल्यासाठी जरडेश्वर कारखाना प्रशासनाने वरिष्ठाकडे अपिल दाखल केल्याचे दिसुन येत नाही. जरडेश्वर साखर कारखान्याने केलेल्या बेकायदेशीर गौण खनिजबाबत कोरेगांव महसुल प्रशासन मूग गिळून बसले आहे. सातारा पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधिक्षक अभियंता घोगरे यांनी कारखान्याचे अतिक्रमणास पुर्ण अभय दिल्याचे दिसून येत आहे. जरडेश्वरने केलेले अतिक्रमण बघून अन्य शेतकरीसुध्दा पाईप लाईनची चारी मुजवून जमीन वहिवाटीस आणण्याची शक्यता आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अन्य उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कांबळे यांनी निवेदनात दिला आहे.