महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । मुंबई । राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटनेचे देशातील सर्वात मोठे पर्यटन विषयक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे २९ सप्टेंबरपासून तीन दिवसांसाठी होत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचे पर्यटन संचालनालय, भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना (IATO) यांच्या संयुक्त विद्यमाने एक कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात पर्यटन विभाग व भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना  यांच्यामध्ये आज सामंजस्य करार झाला. यावेळी पर्यटन मंत्री श्री. लोढा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अध्यक्ष राजीव मेहरा, उपाध्यक्ष  रवी गोसाई, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग, नागरी विमान वाहतूक समिती आणि जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात पर्यटनाचा विकास करताना रोजगारांच्या संधीही निर्माण करायच्या आहेत. त्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रात होत असलेले नावीन्यपूर्ण बदल आणि देशातील पर्यटन क्षेत्रातील सर्व संघटना एकत्र येऊन विचार मंथन होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन आयोजित करत आहे. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान तीन दिवसीय अधिवेशन स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशभरातील पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय अधिवेशनात पर्यटन विषयावर विविध मान्यवर त्यांचे विचार मांडणार आहेत.  पर्यटन क्षेत्रातील बदलांचा आणि पर्यटन क्षेत्रात देशाला व राज्याला कशाप्रकारे पुढे नेता येईल यासाठी या अधिवेशनाचा नक्कीच उपयोग होईल, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!