पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर कर्मचार्‍यांचा वेतनासाठी पुन्हा संप, आनेवाडीत टोलविना वाहने सुसाट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि.२१: पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने आज सायंकाळपासून सर्वच कर्मचार्‍यांनी पुन्हा अचानक संप पुकारला. यामुळे टोलविना वाहने सुसाट निघाली. नंतर कंपनीच्या कार्यालयीन कर्मचार्‍यांनी टोल वसुली सुरु केल्यानंतर टोलनाक्यावर दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या.

टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही यासाठी त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संप पुकारला होता. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने मध्यस्थी करत वीस मार्चपर्यंत वेतन मिळण्याची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यावेळी संप मागे घेण्यात आला होता. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेतन देण्या बाबत कोणत्याही हालचाल व्यवस्थापनाकडून दिसली नाही. त्यामुळे नाक्यावरील कर्मचार्यांनी अचानक संप पुकारला.सर्व कर्मचारी टोल वसुली व्यवस्थापणाकडे काम करतात. संप सुरू केल्याने टोलविना वाहने निघाली सुसाट निघून जाऊ लागली. हा प्रकार कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यावर कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी उभे राहिले. कंपनी व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी कार्यालयीन कर्मचार्‍यांनी टोल नाक्यावर काही लेनवर गर्दी वाढल्याने वाहने विनाटोल सोडून देण्यात येत होती.यानंतर वाहने अडवून टोल वसुली सुरु झाल्याने सातारा पुणे मार्गीकेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

गेल्या तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने कुटुंबा समोर आर्थिक अडचण उभी राहिल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र थोड्या वेळाने वाहतूक सुरळीत झाली. पुणे सातारा मार्गीकेवर वाहने कमी असल्याने येथे गर्दी नव्हती. सातारा जिल्हा प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या संपाच्या अनुषणगाने टोल नाका परिसरात जमावबंदी आदेश लागू केल्याने कर्मचारी आजूबाजूला उभे होते.

काही जण वेतनामुळे कोणीही बूथवर न जाता टोल ऑफिससमोर बसून राहिले होते. टोल व्यवस्थापक विवेक शर्मा यांच्याशी या कर्मचार्‍यांनी चर्चा केली, तेव्हा त्यांनी काम सुरू ठेवा, असे सांगितले. प्रत्येकाला दोन हजार देण्याचे सांगितले परंतु कर्मचार्‍यांनी पूर्ण पगाराची मागणी लावून धरत संप सुरूच ठेवला. सायंकाळी उशिरा पर्यंत कोणताही तोडगा निघाला नव्हता.टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त होता.


Back to top button
Don`t copy text!