दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । बारामती । केंद्र शासनाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे बारामती परिसरातील नोंदणीकृत कामगारांची मोठी संख्या विचारात घेता बारामती मध्ये ESIC हॉस्पिटल होणे गरजेचे असून याबाबत आपण केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी बोलू असे आश्वासन देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय पवार साहेब यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या शिष्टमंडळाला दिले तसेच बारामतीच्या विस्तारित एमआयडीसी मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील एखादा मोठा उद्योगआणण्याचा सकारात्मक विचार करू असेही पवार याप्रसंगी म्हणाले.
बारामती इंडस्ट्रियल मनुफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, अंबीरशाह शेख वकील, संभाजी माने, उद्योजक शिवराज जामदार आदींच्या शिष्टमंडळाने आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करून निवेदन दिले.
या विषयांवर अधिक बोलताना थनंजय जामदार म्हणाले की, कर्मचारी राज्य विमा महामंडळ कायदा बारामती परिसराला 2016 पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यानुसार आस्थापना व कामगार मिळून वेतनाच्या साडेसहा टक्के रक्कम ESIC कडे भरावी लागते. या माध्यमातून विमा महामंडळाने कोट्यावधी रुपये आजपर्यंत वसूल केलेले आहेत. या पशुल्कातून कामगार व त्याच्या कुटुंबीयांना विनामूल्य दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे महामंडळावर बंधनकारक आहे परंतु विमा महामंडळाचे बारामतीत हॉस्पिटल नसल्यामुळे कामगारांना या हक्काच्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. काही खाजगी हॉस्पिटल बरोबर महामंडळाने करार केले आहेत परंतु त्यांच्या सेवा खर्चिक व असमानकारक असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. यामुळे नाईलाजास्तव कामगारांना उपचारासाठी पुण्यातील ई एस आय सी हॉस्पिटल मध्ये जावे लागते ही बाब धनंजय जामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच बारामती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करत असून या नवीन जागेवर ॲटोमोबाईल क्षेत्रातील एखादा मोठा उद्योग आणल्यास बारामती मधील लघुउद्योगांना निश्चित चालना मिळेल त्यामुळे असा आपणाकडून प्रयत्न व्हावा असे साकडे धनंजय जामदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार साहेबांना घातले.