
दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हामध्ये कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) विभागाचे हॉस्पिटल किंवा संलग्न केलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही. सातारा येथे कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाने सातारा जिल्ह्याकरिता १०० बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटल मंजूर केले आहे. त्यासाठी सातारा औद्योगोक क्षेत्रालगत ५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच नवीन विदयुत उपकेंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून महावितरणला सदरचे सबस्टेशन उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांचेकडून सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील फक्त ६० आर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या दोन्ही मागण्यांना ना. फडणवीस यांनी सकारत्मक प्रतिसाद दिल्याने साताऱ्यात कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) विभागाचे हॉस्पिटल आणि एमआयडीसीसाठी नवीन विद्युत उपकेंद्रउभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा जिल्हामध्ये कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) विभागाचे हॉस्पिटल किंवा संलग्न केलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे सातारा येथे कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटल होणेबाबत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र शासनाने सातारा जिल्ह्याकरिता १०० बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटल मंजूर केले आहे. त्यासाठी त्यांना सातारा औद्योगोक क्षेत्रालगत ५ एकर जागेची आवश्यकता आहे. सातारा औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगांची वीजेची गरज दिवसेदिवस वाढत आहे. यासाठी सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये महावितरणचे नवीन उपकेंद्र होणे आवश्यक आहे. सदरच्या नवीन उपकेंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून महावितरणला सदरचे सबस्टेशन उभारणी करीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांचेकडून सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये फक्त ६० आर जमीन हवी आहे.या दोन मागण्यांसाठी मासच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी मुंबई येथे नुकतीच भेट घेतली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. फडणवीस यांचेशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचेकडील प्रस्तावित सातारा मेडिकल कॉलेजच्या बाजूला उपलब्ध असलेल्या जागेमधील ५ एकर जागा कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटलला देण्याची अनुकुलता ना. फडणवीस यांनी दर्शवली असून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एमआयडीसीमध्ये नवीन विदयुत उपकेंद्र झाल्यामुळे उद्योगवाढीस चालना मिळून सातारा औद्योगिक क्षेत्रासोबतच आजूबाजूच्या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रास फायदा होऊ शकेल आणि पुढील १५ वर्षे उद्योजकांना वीजेची कमरता भासणार नाही. त्यामुळे एमआयडीसी येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. याबाबत ना. देवेंद्र यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना केले.
सातारा औद्योगिक वसाहतीलगतच्या देगाव, निगडी व वर्णे गावातील अनेक शेतकऱ्यांनी पडीक व डोंगराळ जमीन औद्योगिक विकासाकरिता देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. सदर जमिनीचा उपयोग उद्योगवाढीसाठी करता येऊ शकेल. तरी शासनाने ज्या शेतकऱ्यांनी जमीन देण्यास अनुकुलता दर्शवली आहे, त्यांची जमीन योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून औद्योगिक वसाहतीकरिता विकसित करावी अशी मागणी मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी यावेळी केली. ना. फडणवीस यांनी एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून पुढील कार्यवाही करण्यास अनुकुलता दर्शवली आहे. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मास पदाधिकाऱ्यांच्या समवेत उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचीही भेट घेतली. यावेळी मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, खजिनदार भरत शेठ आदी उपस्थित होते. दरम्यान, सातारा औद्योगिक क्षेत्रातील महत्वाच्या समस्या सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल दोघांचेही सर्व उद्योजकांच्यावतीने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.