
दैनिक स्थैर्य । दि.२३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । शासकीय निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीने पुन्हा जोर धरला असून त्यासाठी सारे कर्मचारी एकवटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती’च्या माध्यमातून दि. २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानातून ‘पेन्शन संघर्ष यात्रा’ निघाली असून ती राज्यातील सर्व जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.सातारा येथे ही यात्रा गुरुवार, दि. २५ रोजी दुपारी तीन वाजता येणार असून तिची सांगता दि. ७ डिसेंबर रोजी सेवाग्राम, वर्धा येथे होणार आहे, अशी माहिती सातारा जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली. दरम्यान, सातारा येथे संघर्ष यात्रा आल्यानंतर दुपारी तीन वाजता साताऱ्यातील मोरया लॉन्सवर भव्य ‘पेन्शन संघर्ष सभा’ होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २00५ नंतर शासकीय, निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करुन शासनाने अन्याय केला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी सर्व सवंर्गीय साठ संघटना एकत्र आल्या असून त्यांनी ‘जुनी पेन्शन संघर्ष समिती’ तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघर्ष समितीने शासनाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या त्रिस्तरीय आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई ते सेवाग्राम – वर्धा अशी ‘पेन्शन संघर्ष यात्रा’ काढण्यात येणार आहे. यात्रे दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सभा आयोजित करून कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांना जुनी पेन्शनच्या मागणीची दाहकता समजावून त्यांचा पाठिंबा घेण्यात येणार आहे आणि हा प्रश्न शासनदरबारी मार्गी लावण्यात यावा म्हणुन त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दरम्यान, आमच्या मागण्या शासनाने मागण्या नाही केल्यातर दुसऱ्या टप्प्यात सेवाग्राम ते नागपूर विधिमंडळ असा ८0 किलोमीटर पायी पेन्शन मोर्चा काढून लाखो कर्मचारी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे अमोल जाधव यांनी सांगितले.