पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना
स्थैर्य, सोलापूर, दि.29 : कोरोना विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी रूग्ण पॉझिटिव्ह आला की त्याच्या संपर्क ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.
मंगळवेढा येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री भरणे बोलत होते. यावेळी आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.
ना. भरणे म्हणाले, कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सोयी सुविधा कमी पडू देऊ नका. सेंटरजवळील नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत. कोविड केअर सेंटरला पोलीस सुरक्षा द्या, तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढू देऊ नका. पोलिसांच्या मदतीने ट्रेसिंगवर भर द्या.
वेगाने काम करून कोरोनाला हरवूया. पैशाची आणि मनुष्यबळाची अडचण येणार नाही, असे सांगत श्री भरणे यांनी प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतल्या.
भालके म्हणाले, काही ठिकाणी नागरिक कोरोनाच्या टेस्टला विरोध करीत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी टेस्टिंगवर भर द्या. ग्रामीण भागात कॅम्प आयोजित करू, जिल्हास्तरावरून सुविधा पुरवण्याची त्यांनी मागणी केली.
शंभरकर म्हणाले, रॅपिड अँटीजेन टेस्टिंगवर भर द्या. जिल्ह्यासाठी आणखी एक लाख किट मागवल्या आहेत. संशयित असो किंवा नसो फळविक्रेते, दुकानदार यांच्या टेस्ट करा. तालुक्यात रोज 400ते 500 टेस्ट करा.
प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती मांडली. तालुक्यात 449 रुग्णांपैकी 9 मयत असून सध्या 84 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. एक कोविड केअर सेंटर असून याची क्षमता 125 बेडची आहे.
यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, गट विकास अधिकारी संतोष राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आदी उपस्थित होते.