एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर राहणार भर – परिवहन मंत्री अनिल परब

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । औरंगाबाद । कोरोना काळात नागरिक प्रवास करत नसल्याने एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मालवाहतूक, एसटीसाठी वापरणारे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करून उत्पन्न वाढीच्या स्त्रोतांचा विचार करत असल्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष ॲङ अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एसटी गरिबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व नागरिक इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी एसटीचा वापर करतात. आता एसटीला पूर्ण क्षमतेने, व्यवस्थित चालण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली आहे. यामध्ये अजून काही सुधारणा करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या साठा बांधणी, इंजिन आदी विभागांना मंत्री परब यांनी भेट दिली. यावेळी कार्यशाळेचे व्यवस्थापक किशोर सोमवंशी यांनी सुरू असलेल्या कामांबाबत मंत्री परब यांना सविस्तर माहिती दिली.

परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांशी संवाद

कार्यशाळेच्या पाहणीनंतर शहरातील सिडको बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानकाचीही मंत्री परब यांनी पाहणी केली. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये औरंगाबादहून शिर्डी जाणाऱ्या बसमध्ये स्वत: मंत्री परब यांनी प्रवेश करत श्रीरामपूरच्या विकास पोपळघट या प्रवाशाशी संवाद साधला.

या पाहणी दरम्यान मंत्री परब यांच्यासमवेत महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, औरंगाबाद विभाग नियंत्रक अरुण सिया आदींसह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!