विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । पुणे । आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आणि त्यादृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण संचालक महेश पालकर, संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ.महेश आठवले, कार्यवाह प्रा.धनंजय कुलकर्णी, डॉ.स्वाती जोगळेकर, ॲड.अशोक पालांडे, मुख्याध्यापक सुनील शिवले आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री.केसरकर म्हणाले, योगसाधनेद्वारे स्मरणशक्ती वाढविण्यावर आणि मन एकाग्र करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी व्यायामाचे महत्व लक्षात घेऊन शारीरिक शिक्षणासाठी सुविधा देण्यासोबत शालेय जीवनात योगाभ्यास आणण्याबाबत विचार करण्यात येत आहे. आधुनिक तंत्र शिक्षणासोबत गायनासारख्या कलेचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता यावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून स्फूर्ती घ्यावी आणि आपले आयुष्य घडवावे. येत्या १० वर्षात भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याचे नेतृत्व आजचे विद्यार्थी करणार आहेत. या वयात नवे कौशल्य शिकून त्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांची मते लक्षात घेऊन त्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा दिल्यास त्या अधिक उपयुक्त ठरतील. रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींचा वारसा पुढे नेत शाळेच्या लौकिकात भर घालावी आणि कुठलेही काम कमीपणाचे समजू नये असे आवाहन त्यांनी केले.

शालेय स्तरावर शिक्षण आणि क्रीडा हे दोन्ही विषय भविष्यात सोबत असतील, व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात येत आहे, ई-लर्निंग सुविधा राज्यातील प्रत्येक भागात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, नवे शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक साधने पुढील वर्षापर्यंत शाळेत उपलब्ध होतील, तिसरीपासून परीक्षा घेण्याबाबतही तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे, गृहपाठ स्वयंस्फूर्तीने करायचा अभ्यास आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठची आवश्यकता भासू नये किंवा खाजगी क्लासची गरज भासू नये असे शिक्षण द्यावे असेही त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

डॉ. के. एच. संचेती म्हणाले, शाळेत होणाऱ्या शिक्षणासोबत उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. आपल्यासोबत इतरांचेही कल्याण व्हावे यासाठी कार्य करा असा संदेश त्यांनी दिला.

डॉ.प्रमोद चौधरी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. रमणबाग प्रशालेने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिल्याने अनेक यशस्वी विद्यार्थी घडले असे त्यांनी सांगितले.

डॉ. चौधरी यांनी दिलेल्या ७५ लाख रुपयांच्या देणगीतून सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास उपक्रमांचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्धाटन श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रमणबाग प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी डॉ.प्रमोद चौधरी, पद्मविभूषण डॉ.संचेती यावेळी सत्कार करण्यात आला. मंत्री केसरकर यांच्या हस्ते प्रशालेच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘अमृतकलश’ या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!