दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून 400 कोटी नुकतेच मंजुर करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या पेक्षा अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता जम्बो कोविड हॉस्पिटलसह आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर बी.टी आलदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र सैनिक व शहिद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.
संपूर्ण जग कोविड -19 च्या विळख्यात अडकलं होतं, पण धोका अजून संपलेला नाही पण मागच्या दोन वर्षात शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय, लोकांनी दाखवलेला संयम आणि प्रशासनातले अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुकास्पद काम केले असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी सातारासह जिल्ह्यात कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आवश्यक त्या सोयी-सुविधा देण्याचे काम करत आहे. तसेच यापुढेही रुग्णसंख्या वाढल्यास जम्बो हॉस्पीटल रुग्णसेवेसाठी उपलब्ध असेल.
सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी सन 2022-23 साठीच्या कमाल नियतव्यय मर्यादेनुसार रु. 314 कोटी 42 लक्षच्या आराखड्यामध्ये 85.58 कोटीची वाढ करुन रुपये 400 कोटीच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
जिल्ह्यात झालेला अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आपदग्रस्त नागरिकांना मदत करण्यात आली. आपतग्रस्तांना 149 कोटी 22 लाख 90 हजारांची मदत करण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेकऱ्यांच्या कर्ज खात्यात 372.05 कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत मागील दोन वर्षामध्ये एकूण 1 लाख 92 हजार 621 शेतकरी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात 31.24 कोटी अनुदान जमा करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजूरी देत असल्याचे कळविले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल शिवाय एमबीबीएसच्या शंभर जागा निर्माण झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार. तसेच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांच्या रुग्णालयासाठी 495.46 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. सैनिक स्कूलच्या सोयी सुविधांसाठी राज्य शासनाने यावर्षी 285 कोटींची तरतूद केली आहे.
जिल्ह्यात महा-आवास अभियान-ग्रामीण 2021-22 अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांमधून 4 हजार 936 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. शिव भोजन योजना 26 जानेवारी 2020 पासून अंमलात आली असून कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यात 5 लाख 94 हजार 219 शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत 880 लाभार्थ्यांना 5 कोटी 45 लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत व इतर योजनेंतर्गत 250 शेतकरी कंपनी स्थापन. त्यापैकी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत 31 शेतकरी कंपनी पात्र ठरल्या. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत 887 हेक्टर क्षेत्रावर 1 हजार 557 लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचन संचासाठी 3 कोटी 3 लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध फळपिकांची 2048.63 हे. क्षेत्रावर नवीन लागवड करण्यात आली आहे.
कृषी धोरण-2020 अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये कृषीपंपासाठी एकूण 15 हजार 591 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 9 हजार 25 ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत 6 हजार 566 ग्राहकांचे वीज जोडण्यांचे काम प्रगतीपथावर आहे. उपलब्ध निधी पैकी 33 टक्के निधी जिल्हास्तरावरील कामांकरीता वापरण्याकरीता अंदाजे 50 कोटी इतका निधी उपलब्ध असून या निधीपैकी 48.14 कोटी इतक्या निधीमधून जिल्ह्यांतर्गत नवीन उपकेंद्र व उपकेंद्रे क्षमतावाढ यासाठी 19 प्रस्ताव मंजुरीसाठी प्रास्तावित करण्यात आलेले आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत 55 लिटर दरडोई प्रमाणे प्रत्येक घराला वर्षभर शाश्वत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. एकूण 5 लाख 77 हजार 43 नळ कनेक्शन पैकी एकूण 83 टक्के नळ कनेक्शन पूर्ण झालेले आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 763 गावांपैकी 256 गावांची एफएचटीसी पूर्ण झालेली आहे व 500 गावांमध्ये शंभर टक्के नळ कनेक्शन पूर्ण झालेले आहेत. जिल्ह्यातील 3 हजार 524 शाळा व 4 हजार 611 अंगणवाडी 100 टक्के नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेने शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट काम केले आहे.
सातारा जिल्ह्यातील निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्सिटट्यूटचे डायरेक्टर अनिलकुमार राजवंशी यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे विशेष अभिनंदन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.