दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वेळच्या वेळी देणारा कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. राज्यातच नव्हे तर देशात अजिंक्यतारा कारखान्याने एक आदर्श निर्माण केलेला आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून शेतकऱ्यांना आणखी चांगला ऊसदर देता यावा यासाठी उपपदार्थ निर्मीतीवर जास्त भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी व इथेनॉल प्लॅन्टची दैनिक क्षमता ३०,००० लिटर्स वरून ४५,००० लिटर्स करण्यात आली असून या प्रकल्पातून उत्पादन घेण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आणि सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. दिपावली सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावेळीही कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत “दिपावली किट” वाटपाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ऊस उत्पादकांना एफ.आर.पी.प्रमाणे उच्चतम ऊसदर देता यावा व उसाचे पेमेंट वेळेत आदा करता यावे, याकरिता कारखान्याची आर्थिक स्थिती आणखी भक्कम असणे आवश्यक आहे. कारखान्याचे आर्थिक उत्पन्न आणखी वाढविण्यासाठी उपपदार्थ निर्मितीवर भर देणे गरजेचे असून त्यादृष्टीने कारखान्याची वाटचाल सुरु आहे. चालू गळीत हंगामात निश्चित केलेल्या एकूण ७.५० लक्ष मे.टन ऊसापैकी ६०,००० मे.टन ऊसाच्या रसापासून अंदाजे ४५.०० लक्ष लिटर्स इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. उर्वरित ६.९० लक्ष मे.टन ऊसापासून निघणाऱ्या २६,९०० मे.टन सी हेवी मोलॅसिसचे उत्पादन होईल. त्यापैकी ८,००० मे.टन मोलॅसिसपासून १७.५० लक्ष बल्क लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीटचे उत्पादन घेतले जाणार आहे.
यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न व्हावा यासाठी कारखान्याने आवश्यक ते नियोजन केलेले असून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंड सहन
करावा लागणार नाही, यासाठी मागील हंगामाप्रमाणेच चालू गाळप हंगामातसुध्दा ऊस गाळपास आल्यानंतर १० दिवसात ऊसाची पहिली उचल आदा करण्याचे नियोजन केले असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले.