स्थैर्य, नांदेड, दि.१९: जिल्ह्यातील कोविड बाधिताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत आहोत. सोळा तालुक्यासह आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात असला तरी प्रत्येक तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात जिल्ह्यातील बाधिताना आरोग्याच्या सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितले असून आजच्या घडीला ऑक्सीजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड महानगरातील आणि जिल्ह्यातील वाढती कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेवून भक्ती लॉन्स येथे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन व पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर सारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत आम्ही ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि परिपूर्ण करु असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात असून याचा तुटवडा आहे हे नाकारता येत नाही. राज्यात सर्वत्रच याचा तुटवडा असून शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे त्याठिकाणी कायदेशिर कार्यवाही करुन मार्ग काढीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जी काही माहिती असेल ती मिळणे आवश्यक असून यासंदर्भात प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथे माहिती केंद्र सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या. या नवीन कोविड केंद्रातील ऑक्सीजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही यांची खातरजमा त्यांनी स्वत: करुन घेतली. या दोनशे खाटांच्या भव्य कोविड हेल्थ सेंटर येथे सर्व बेड ऑक्सीजन यंत्रणेसह असून आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत 112 जणांचा स्टाफ असून तो चार शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे. तसेच चोवीस डॉक्टराचे पथक या जम्बो सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन करेल. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.