
दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । सातारा । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दुपारी एक वाजता लोणंद येथील आपला अडीच दिवसांचा मुक्काम आटपून पुढील मुक्कामासाठी तरडगावच्या दिशेने रवाना झाला. तत्पूर्वी लोणंद नगरपंचायत आणि महसूल विभागाकडून पालखी सोहळा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
लोणंद येथील मुक्कामात दोन वर्षांच्या खंडानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले होते. आज सोहळा पुढील मुक्कामासाठी निघण्याच्या पुर्वी दोन्ही अश्व माऊलींच्या दर्शनासाठी आणण्यात आले. एक वाजता लोणंदकरांनी आपल्या खांद्यावर माऊलींच्या पादुका असलेली पालखी घेऊन वाजतगाजत पालखी खंडाळा रोडवरील आळंदीकर ज्वेलर्स पाशी ऊभ्या असलेल्या माऊलींच्या चांदीच्या रथापर्यंत नेली. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी लोणंद येथून पंढरीच्या दिशेने तरडगावकडे मार्गस्थ झाला. यावेळी लाखो वैष्णवांसह ग्रामस्थांनी हरिनामाचा गजर केला. माऊलींच्या प्रस्थानावेळी जोरात मेघ बरसू लागले. जणूकाही निरोपाच्या वेळेस भावनिक झालेल्या लोणंदकरांच्या मनात दाटलेल्या भावनांना मेघराजच वाट करून देत आहेत असे वाटत होते.
माऊलींचा परतीचा प्रवास पालखीतळापासून शास्त्री चौक मार्गे स्टेशन चौक, अहिल्यामाता चौक करत फलटण रोडवरून तरडगावच्या दिशेने निघाला. लोणंदच्या पुढे सरदेचा ओढा ओलांडून पालखी सोहळा फलटण तालुक्यातील कापडगाव हद्दीत पोहचताच फलटण तालुक्याच्या वतीने माऊलींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर माऊलींचा सोहळा आपल्या पहिल्या ऊभ्या रिंगणासाठी तरडगावच्या दिशेने चांदोबाच्या लिंबाकडे जायला निघाला.
माऊलींचा रथ रवाना होण्यापूर्वी आकर्षक फुलांची सजावट करून सजवण्यात आला होता. लोणंद मुक्कामाला येताना माऊलींच्या रथावर फुलांनी “ज्ञानोबा” अशी अक्षरे काढलेली होती तर आज माऊलींच्या चांदीच्या रथावर फुलांनीच “कैवल्य” अशी अक्षरे काढलेली आहेत. या रथाभोवती सेल्फी काढण्यासाठी तरूणांनी मोठी गर्दी केली होती.