
स्थैर्य, सातारा, दि. २७ : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.
याबाबत जिल्हाधिकार्यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सातारा येथील संगम माहुली येथील स्मशान भूमीमध्ये सातारा नगरपालिकेच्या वतीने कोवीड 19च्या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींचे गेल्या वर्षापासून आजपर्यंत (मार्च 2020 पासून) अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड पूरवण्याचा ठेका सातारा नगरपालिकेच्या वतीने तेथे जवळच असणार्या राजेंद्र कदम या वखार मालकास दिला आहे. एका कोवीडच्या अंत्यसंस्कारासाठी 12 मण (440 किलो) लाकूड व वाहतूक खर्च 200/- रु. अशी पावती वखारीतून नगरपालिकेला मिळत आहे.
सातारा नगरपालिकेला वखार खालीलप्रमाणे एका कोवीड मृत रुग्णासाठी प्रतिमण 300 प्रमाणे 12 मण लाकडपोटी 3600 व लाकूड वाहतूक खर्च 200 असे 3800 रुपयांचे बिल दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात एकाच ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये मृत कोवीड रुग्णांसाठी लागणारे लाकड न वजन करता संपूर्ण ट्रॉली भरून प्रत्येक मृत रुग्णाच्या अग्निकुंडापाशी टाकत आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचे मोजमाप नाही. परंतु, नगरपालिकेला सादर करत असलेल्या बिलामध्ये प्रत्येक मृत कोवीड रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड असा 100 फूट अंतरासाठी वाहतूक खर्च 200 रुपये प्रत्येक मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखवत आहेत. हा प्रकार शासनाची आर्थिक फसवणूक करणारा आहे.
प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे अंत्यसंस्कार करत असलेल्या अग्णीकुंडात प्रत्यक्षात 7 मण एवढेच लाकूड बसत आहे. त्यापेक्षा जास्त लाकूड आणीकुंडात बसतच नाही. तसेच अत्यंसंस्कारासाठी लागणारे लाकूड बघितले असता, असे दिसून आले की ते रायवळ लाकूड आहे. त्या रायवळ लाकडाचा आजच्या बाजार भावाप्रमाणे दर 250 रुपये प्रती मण इतका आहे. याचाच अर्थ असा की, रायवळ लाकूड 7 मणाप्रमाणे 1750 व 100 फूट अंतरासाठी लाकडाचा वाहतूक खर्च 50 मिळून एकूण 1800 इतका खर्च येत आहे.
म्हणजेच प्रत्येक मृत कोवीड रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी 1800 रुपये खर्च होत असताना वखार मालक नगरपालिकेला व तेथील अधिकार्यांना हाताशी 2000 रुपये जास्त दाखवला जात आहे. आजपर्यंत सुमारे 1500 व त्यापेक्षा अधिकच कोवीड मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच तीस लाख एवढ्या रक्कमेचा अपहार झालेला आहे असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतही असा गैरव्यवहार अत्यंत घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. संबंधीत अधिकारी व वखार मालक संगनमत करून राजरोसपणे हा प्रकार करत आहेत. अशा अधिकार्यांवर व वखार मालकावर योग्य ती कारवाई करावी. संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकार्यांनी स्वत: चौकशी करून कागदपत्रांची, बिलांची पाहणी करून, वजन न करता लाकडाची वाहतूक करणार्या व संपूर्ण गैरकारभार करणार्या पालिकेच्या अधिकार्यांना निलंबीत करावे आणि अपहार झालेल्या रकमेची वसूली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.