म्हसवड मध्ये मराठा समाजाचा एल्गार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

म्हसवड येथे आरक्षण संदर्भात एकत्रित आलेला सकल मराठा समाज.

स्थैर्य, म्हसवड, दि.१८: मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी म्हसवड येथे मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन जोरदार उठाव केला. तसेच ऐकीच्या वज्रमुठीने त्यांनी एल्गार पुकारला.

मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने आरक्षण दिले होते. या आरक्षणाला इतर समाजातील याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. यामुळे मराठा समाजात साशंकता निर्माण झाली असून सर्वत्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात म्हसवड तालुका माण येथील मराठा समाज प्रमुख प्रतिनिधींची तसेच पालक प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. यावेळी बोलताना राज्यरंगकामगार सेनेचे कार्याध्यक्ष धनाजी सावंत, अध्यक्ष विश्वासराव साळूंखे , प्रा. विश्वंभर बाबर , बाबासाहेब माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना धनाजीशेठ सावंत म्हणाले मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही अहोरात्र झटत आहे . मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचे असून ते आम्ही मिळवणारच. मराठा मोर्चाच्या माध्यमातून वाटेल ती किंमत मोजून सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे. प्रसंगी रस्त्यावर येऊन आरक्षण मिळवणारच असा इशारा सावंत यांनी दिला .

यावेळी बोलताना प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले मराठा समाजातील तरुणांना न्याय देण्यासाठी मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे. राजकारण बाजूला ठेवून मराठा विद्यार्थी व युवकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बाबर यांनी केले. आरक्षणाच्या हक्कासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याचा इशारा यावेळी विश्वंभर बाबर यांनी दिला.

यावेळी बाबासाहेब माने म्हणाले मराठा तरुणांनी स्वार्थी लोकप्रतिनिधीं पासून सावध राहा. मराठा तरुणांना मदतीचा हात देण्यासाठी आरक्षण ही महत्त्वाची बाब आहे. आमचं आम्हाला द्या दुसऱ्याचे नको असे सांगून आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आव्हान माने यांनी केले. प्रा. नंदकुमार धनवडे यांनी मराठा आरक्षणाबाबतचा सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. आरक्षणाचे विविध प्रकार व त्यामधील दोष इतर राज्यातील आरक्षण टक्केवारी तसेच मुख्य आरक्षण आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण इत्यादींबाबत धनवडे यांनी मार्गदर्शन केले . शिवाजीराव यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत आपले परखड मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांमधील सर्वांनी एकत्र राहून आरक्षणाबाबत सक्रिय राहण्याचे आव्हान केले तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जनार्दन सूर्यवंशी , आकाश माने, सुधीर माने, अनिल माने, बाळासाहेब जाधव,अंकुश शिर्के, विकास शिर्के, विजयकुमार धोत्रे, नीलेश काटे, अमोल बळवंत माने, बाळासाहेब माने, रामदास भोईटे, अजित काटकर, विठ्ठल काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने मराठा आरक्षणाची स्थगिती उठविण्याची ठिणगी तयार झाली असून त्याचा वणवा निर्माण होण्यासाठी मराठा समाज एकवटल्याचे दिसून आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!