
सातारा, दि.३०: कोरोना महामारीतही धोका पत्कारून सेवा देणार्या एसटी कर्मचार्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत आहे. हे थकीत वेतन दि. 7 ऑक्टोबरपर्यंत न दिल्यास दि. 9 राज्य भर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोविड 19 च्या महामारीत एस टी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत असताना तीन-तीन महिने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकारकडून मदत मागितली आहे. परंतु, या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटननेने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. मात्र, पगार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जर येत्या 7 तारखेपर्यंत जुलै अॅागस्ट दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन व सप्टेंबर महिन्यांचे देय वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधीकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी पत्रकात दिला आहे.