दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेच्या उच्चदाब ग्राहक क्र. २०२२१९००७५ याचे मंगळवार दि. २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजुन ४२ मिनिटांनी बंद करण्यात आले व संध्याकाळी सात वाजुन ३५ मिनिटांनी पुन्हा चालू करण्यात आला असल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे फलटणचे कार्यकारी अभियंता यांनी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांना दिलेले आहे.
फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अशोकराव जाधव बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, प्रविण आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण नगरपरिषदेने विजबील न भरल्यानेच विज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. जर आम्ही आवाज उठवला नसता तर फलटण शहराला सुमारे चार दिवस पाणीपुरवठा खंडित झाला असता. आम्ही आवाज उठल्यानेच वीजबिल तातडीने भरून वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे, असेही माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
याबाबत बोलताना माजी नगरसेवक अशोकराव जाधव म्हणाले की, फलटण नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी हे प्रशासक या नात्याने विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. फलटण नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी मंडळीना खुष ठेवण्यासाठी मुख्याधिकार्यांनी काम करू नये. मुख्याधिकारी शासनाचे सेवक आहेत. त्यांनी फलटण शहराच्या विकासासाठी आग्रही असणे गरजेचे आहे.