स्थैर्य, पाटण, दि. ०४ : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी डोंगरी विकास आराखड्यातून भरीव स्वरूपाचा निधी मंजूर केल्याने चव्हाणवाडी येथील एका कुटुंबाच्या घरात तब्बल 40 वर्षांनंतर वीज येत आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबातील सदस्यांच्या चेहर्यावरील हास्य अनेक वर्षांनंतर फुलले आहे. यासाठी पाठपुरावा करणार्या ना. देसाई यांच्या चाफळ विभागातील पदाधिकार्यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
ना. शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात विद्युत विकासाची कामे करण्यासाठी डोंगरी आराखडा तयार करून त्यास भरीव निधी मंजूर केला आहे. सध्या मतदारसंघातील विविध भागात वीज वितरण कंपनीच्या मंजूर झालेल्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. ना. देसाई यांनी मंजूर केलेल्या कामाचा उपयोग हा सर्वसामान्य व गरजू कुटुंबीयांना होण्यासाठी चाफळ विभागातील पदाधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमध्ये बाधित कुटुंबीयांना मदत असो की कोरोनाच्या काळात गरजू कुटुंबीयांना मदत वाटप असो, ही मदत सर्व गरजूंना मिळण्यासाठी चाफळ विभागातील पदाधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे संपूर्ण चाफळ भागातील जनता अनुभवत आहे. गेली 40 वर्षे घरामध्ये लाईट नसलेले रामचंद्र चव्हाण यांचे कुटुंब वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आपला उदरनिर्वाह करत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने विजेसाठी आवश्यक असलेल्या पाच वीज पोलसाठी सुमारे एक ते सव्वा लाख रुपये खर्च करणे चव्हाण कुटुंबीयांचे आवाक्यात नव्हते. त्यामुळे येईल त्या संकटांशी सामना करणं नित्याचेच झाले होते. आपल्या घरात कधी वीज येईल हा विचार त्यांनी केव्हाच सोडून दिला होता. परंतु संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौल बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील, प्रकाश नेवगे व पदाधिकारी यांनी यासाठी ना. देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला. ना. देसाई यांनी तत्काळ डोंगरी आराखड्यातून या गावांसाठी पाच वीज पोल मंजूर केले व काही दिवसातच त्याबाबत कार्यवाही सुरू केली. त्यामुळे 40 वर्षांपासून अंधारात दिवस व्यतीत करणार्या रामचंद्र चव्हाण यांच्या घरात विजेची सोय झाल्याने चव्हाण कुटुंबीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदरचे विजेचे पाच पोल उभारण्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.