
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑगस्ट : फलटण शहर आणि तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आणि घरोघरी गौरी आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार आणि अवेळी होणाऱ्या वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या घराघरात गौरी आगमनासाठी स्वच्छता, सजावट आणि डेकोरेशनची लगबग सुरू आहे. अनेक घरांमध्ये आणि गावांमध्ये गौरी-गणपतीनिमित्त अखंड विद्युत रोषणाई करण्याची परंपरा आहे. मात्र, ऐन मोक्याच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणपती बाप्पा अंधारात राहत आहेत, ज्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा भंग होत आहे.
विद्युत वितरण कंपनीने किमान सणासुदीच्या दिवसांत तरी वेळापत्रकाचे पालन करून सुरळीत वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना, कोणताही पूर्वकल्पना न देता वीज गायब होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या गलथान कारभाराचा फटका गौरीच्या तयारीमध्ये व्यस्त असलेल्या महिलांना बसत असून, त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
तरी वीज वितरण कंपनीने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन, किमान उत्सवाच्या काळात तरी अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी फलटण शहर आणि तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.