स्थैर्य, दि.२३: बिहार सरकारने पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या ऐच्छिक सेवानिवृत्तीला (व्हीआरएस) मंजुरी दिली आहे. पांडे यांनी उगाच आपला राजीनामा दिलेला नाही असे म्हटले जात आहे. यावेळी ते प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकत आहे. कारण 2009 मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आलेली नव्हती. त्यावेळी त्यांची भाजपशी अंतिम चर्चा झाली होती. दुधाने तोंड पोळल्याने आता गुप्तेश्वर पांडे हे ताकही फुंकून पितील. 2009 मध्ये त्यांनी राजीनामा देऊन मोठी रिस्क घेतली होती. तेव्हा त्यांच्या नोकरीचे जवळपास 11 वर्षे शिल्लक होते. यामुळे यावेळी त्यांनी कोणतीही जोखीम न घेता राजीनामा दिला आहे. जेदयूने त्यांचे तिकीट फायनल केल्याचे वृत्त आहे.
अनेक महिन्यांपासून सुरू होती गुप्तेश्वर पांडेंच्या राजीनाम्याच्या चर्चा
गेल्या अनेक महिन्यांपासून गुप्तेश्वर पांडेंच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू होत्या. पांडेय यांची राजकारणात येण्याची धडपड सातत्याने दिसून येत होती. 2 दिवसांपूर्वी ते बक्सर येथे गेले आणि तेथील जदयूचे जिल्हा अध्यक्षांसोबत त्यांनी भेट घेतली. तेव्हाच स्पष्ट झाले की, पांडेय आपली पुढची इनिंग राजकारणात करणार आहेत. ते सध्याच्या काळात सातत्याने जदयूच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात राहिले आणि याचा फायदा त्यांना निवडणुकांमध्ये मिळणार आहे.
नितीश यांचे खूप सहकार्य लाभले आहे
पांडे यांना मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सहकार्य लाभले आहे. पांडे यांनीही नितीशकुमार यांचे समर्थन केले आहे. 31 जानेवारी 2019 पूर्वी ते बिहारचे डीजीपी नसताना संपूर्ण बिहारमध्ये दारू बंदीसाठी त्यांनी मोहीम राबवली होती जी मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली होती. असे मानले जाते की, नितीश यांनी यावर खुश होऊन पांडे यांना डीजीपी पदाची भेट दिली होती. अलीकडेच रिया चक्रवर्तीने सुशांतसिंग राजपूत प्रकरणात नितीशकुमार यांच्याविषयी भाष्य केले तेव्हा पांडे यांनी रिया चक्रवर्तीला औकातीत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या शब्दावरुन प्रचंड वादही झाल्याचे पाहायला मिळाले होते.
गुप्तेश्वर बक्सरमधून निवडणूक लढवू शकतात
सूत्रांच्या माहितीनुसार जेडीयू शहाबादमधील प्रभाव वाढवण्यासाठी डीजीपी पांडे यांना बक्सर शहरी सीट किंवा लागून असलेल्या कोणत्याही जागेवरुन विधानसभा निवडणूक लढवू शकते. असे मानले जाते की शहाबादमधील सासाराम, बक्सर, आरा लोकसभा जागा भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र आता जेडीयूला या भागात स्वत: ला बळकट करायचे आहे. गुप्तेश्वर पांडे ब्राह्मण समाजातून आले आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण बिहारमध्ये जेडीयू पांडे यांना ब्राह्मण नेता म्हणून सादर करू शकते. शहाबाद भागातही पांडेचा चांगलाच प्रभाव आहे. शहाबाद भागातील निवडणुकीत जेडीयू पांडे यांचा वापर करेल आणि त्यांना ब्राह्मण नेते म्हणून सादर करेल.